Video : भाजपानंतर शिवसेनेचेही मध्यावधी निवडणूकांचे संकेत

जुलैमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे खा. संजय राऊत यांचे वक्तव्य

0
देशदूत डिजिटल विशेष

नाशिक, (प्रतिनिधी) ता. १० :  भारतीय जनता पार्टीच्या गोटातून मध्यावधी निवडणूकांचे संकेत दिले जात असतानाच आता शिवसेनेनेही मध्यावधी निवडणूकांसाठी सज्ज असल्याचे संकेत आज दिले आहेत.

त्यावरून येत्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात गुजरात, मध्यप्रदेशसोबतच निवडणूका लागणारा असल्याचे अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

आज नाशिक येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जुलैमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे सुतोवाच करून मध्यावधी निवडणूकांना शिवसेना सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.

शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानांतर्गत नाशिक येथे सेना पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील वक्तव्य केले.

समृद्धी महामार्ग कोणत्याही स्थितीत होऊ देणार नसल्याचा उद्धव ठाकरे यांचा शब्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने राज्यात डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूका होणार असल्याचे अधिकृतपणे देशदूत डिजिटलला सांगितले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांसह सर्वांसाठी चांगली कामगिरी केली असून मध्यावधी निवडणूकांनंतर भारतीय जनता पक्ष बहुमताने निवडून येणार असल्याचेही हा पदाधिकारी म्हणाला.

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर भाजपाबरोबरच असलेले शिवसेनेचे संबंध अधिकच ताणले गेले असून त्यापेक्षा निवडणूका योग्य अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी  नुकतीच मुंबई येथे एका बैठकीत घेतल्याचे समजते.

त्यामुळेच शेतकरी संपानंतर लगेच कर्जमाफीचा निर्णय न घेता. सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घ्यायचा आणि त्याचा राजकीय फायदा मध्यावधीसाठी करवून घ्यायचा हे भाजपाचे राजकीय धोरण असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र कर्जमाफीचे श्रेय भाजपाला घेऊ न देता त्याआधीच त्यांचा पाठिंबा काढायचा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सत्तेतून बाहेर पडलो याचा राजकीय फायदा घ्यायचा अशी राजकीय भूमिका शिवसेना घेणार असल्याचे समजते.

त्यामुळेच आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राजकीय भूकंपाची भाषा केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले असून महाराष्ट्राला तीन वर्षांतच पुन्हा विधानसभा निवडणूकांना सामोरे जावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

*