मका बाजरीची पोकळ कणसे पाहून दुष्काळ पाहणी पथक हेलावले

0

मालेगाव (प्रतिनिधी) ता. ६ : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी स्थितीमुळे यंदा लाखो शेतकऱ्यांचे बाजरी, कापूस आणि मक्यासारखे पीक हातचे गेले, तर काहींच्या शेतात काहीच पिकविता आले नाही.

या पार्श्वभूमीवर आज केंद्रातील पथकाने मालेगाव तालुक्यात दुष्काळी स्थितीची पाहणी केली.  मका आणि बाजरीची दाणे न भरलेली कणसे, शेततळ्यात नसलेले पाणी अशी अवस्था पाहून पाहणी पथकातील अधिकारीही हेलावले.

यावेळी अधिकाऱ्यांनी दुष्काळी स्थितीसह शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि मिळालेले उत्पन्न यासारखी माहिती शेतकऱ्यांकडून घेतली.

मेहुणे, वऱ्हाणे, जळगाव (नि) या गावांत पथकाने पाहणी केली. मेहुणे गावातील शोभाबाई देवरे यांच्या भुईमुगाचे शेत,  महादू देवरे यांचे मक्याचे शेत, जळगाव (नि) येथील शेतकरी भिकू माळनारे यांचे बाजरीचे शेत, वऱ्हाणे येथील बाबूराव पवार यांचे ठिबक सिंचन वरील डाळिंब पिक यासह जळगाव (नि) येथील सामुहिक शेततळे यासह विविध शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

केंद्राच्या या पथकामध्ये डॉ. शालिनी सक्सेना, ए.के. तिवारी, आर.डी. देशपांडे, श्रीमती झा या अधिकारी व कृषी शास्त्रज्ञांचा समावेश होता.

यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळासंदर्भातील विविध कैफियत पथकासमोर मांडली. अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे. मात्र असे असूनही त्याचा लाभ मात्र त्यांना मिळत नसल्याची प्रमुख तक्रारही शेतकऱ्यांनी पथकाकडे  केली.

या पथकासोबतच नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जि.प. बांधकाम सभापती मनीषा पवार, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद शेलार, यांच्यासह मेहुणे, वऱ्हाणे, जळगाव (निं.)  या गावांचे सरपंच आणि प्रतिष्ठित शेतकरी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*