Type to search

ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : यंत्र अभियांत्रिकी शिक्षणातील संधी

Share

वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक व प्रत्यक्षातील ज्ञान मिळविण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना अभियांत्रिकी असे म्हणतात. सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला अभियांत्रिकी म्हटले जाते. बांधकामे,यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडे व निर्मिती करणे हे अभियांत्रिकीची प्रमुख कार्ये आहेत.

यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) ही अभियांत्रिकीची सर्वात जुनी व विस्तृत अशी शाखा आहे. १८ व्या शतकात सुरु झालेल्या युरोपातील औद्योगिक क्रांती नंतर खऱ्या अर्थाने या शाखेला उभारी मिळाली.
यंत्र अभियांत्रिकी मध्ये यंत्रांची निर्मिती करणे, त्यांचे संचलन करणे व त्या द्वारे उत्पादन निर्माण करणे.किंवा त्यावर प्रक्रिया करणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो.
त्यासाठी विज्ञानातील भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र,गणित व सांख्यिकी इत्यादी शाखांतील मूलभूत तत्वांवर आधारित संकल्पनांची योग्य सांगड घालावी लागते.
एखाद्या संकल्पनेतून समाजोपयोगी उत्पादन किंवा प्रक्रिया निर्मिती करणे व बाजारात त्यांचे वितरण करणे हे यंत्र अभियंत्याचे प्रमुख कार्य असते.
आजच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रात यंत्र अभियंत्यांची गरज असते. जसे की, वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या, विमान व जहाज बांधणी करणाऱ्या कंपन्या, वेगवेगळे उत्पादन व प्रक्रिया उदयॊग, संगणक व विदयुत उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, विदयुत निर्मिती आणि वितरण करणाऱ्या कंपन्या,रासायनिक  उत्पादन क्षेत्रातील कंपन्या, खनिज तेल शुद्धीकरण कारखाने,बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, इत्यादी तसेच यंत्र अभियंता केंद्रीय लोकसेवा आयोग व विविध राज्यांचे लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या माध्यमांतून भारत सरकार व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांत अधिकारी पदांवर कार्य करू शकतात.
जसे की, केंद्रीय रेल्वे सेवा, केंद्रीय संरक्षण विभाग, केंद्रीय खाणकाम विभाग, जलसंपदा व पाणीपुरवठा विभाग, ऊर्जा निर्मिती केंद्रे, केंद्रीय संशोधन संस्था उदाहरणार्थ इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) बी.आर.सी. (भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर) इ. मोटार वाहन निरीक्षक इ. बदलत्या काळानुसार यंत्र अभियंते, बँकिंग क्षेत्रे, वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी विविध उपकरणे व यंत्रांची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामात देखील आपले करिअर घडवू शकतात.
जे विद्यार्थी यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) शाखेमध्ये आपले करिअर घडवू इच्छितात त्यांच्यासाठी पदविका व पदवी असे दोन पर्याय प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध आहेत.
यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) प्रवेशानंतर विद्यार्थी त्याच शाखेत उच्च शिक्षण देखील घेऊ शकतात.पदविका अभ्यासक्रम हा तीन वर्षांचा असतो. या अभ्यासक्रमासाठी किमान पात्रता दहावीची परीक्षा गणित व विज्ञान विषयांसह ३५ % गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमांतून गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थी आपल्याला हव्या असलेल्या तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश मिळवू शकतो. पदविका अभ्यासक्रमानंतर  विद्यार्थी थेट द्वितीयवर्षे  पदवी प्रवेशास पात्र ठरू शकतात. पदवीचा अभ्यासक्रम  हा चार वर्षाचा असतो. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून महाराष्ट्रातील संस्थांमधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे राष्ट्रीय पातळीवरील संयुक्त परीक्षा (JEE) आणि इयत्ता बारावी मध्ये विद्यार्थ्यानी संपादित केलेले गुण  यांच्या आधारे करण्यात येणार आहे.
त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर JEE परीक्षेचे मुख्य भागांचे ५० % गुण व इयत्ता १२ वी चे गणित, भौतिक व रसायनशास्त्र या विषयांचे एकत्रित ५० % गुण यांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत.
अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याना पूर्ण फी भरावी लागत नाही.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, भटके विमुक्त,विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्ग तसेच अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्याना शासनामार्फत शिष्यवृत्ती मिळू शकते. या शिवाय फी भरण्यासाठी वेगवेगळ्या बँकांकाडूनही शैक्षणिक कर्ज मिळते.
प्रवेशित एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळ जवळ ७० % विद्यार्थी  शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यास पात्र ठरतात. यंत्र अभियांत्रिकी शाखा ही कालानुरूप विकसित होत जाणारी शाखा आल्यामुळे विद्यार्थ्याना यात करिअर करण्याची व देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याची सुवर्ण संधी  उपलब्ध आहे.
शब्दांकन – राजेंद्र उबाळे  ‘ग्रंथालय आणि माहितीशास्त्र निष्णात’
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!