Video : कर्करोगावर नाशिकच्या ‘आर्ट आणि म्युझिक थेरपी’चे रुग्णांना वरदान

0

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक (दिनेश सोनवणे) | पूर्वी अनेक रुग्ण कॅन्सर ऐकूणच अर्धमेले व्हायचे. कॅन्सर कुणालाही होऊ नये यासाठी प्रार्थना केल्या जायच्या.  वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांमुळे होणारे कॅन्सर तसेच महिलांचे स्तन कॅन्सरचे प्रमाण गत काही वर्षांत वाढले आहे. याबाबत जनजागृती झाली हेही तितकेच खरंय. रुग्ण बोलू लागलीत, यातून आजारावर विविध प्रकारचे संशोधन व्हायला वाव मिळाला. आज नाशिकसारख्या शहरात अमेरिकेसारख्या बड्या देशात होत असलेली शस्रक्रिया व्हायला लागली आहे.

या दुर्धर आजारावर संशोधन व्हायला लागले. पुढे रुग्णांना मानसिक ताण, तणावातून मुक्त करण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले जाऊ लागले. एखाद्या रुग्णाला कॅन्सर निष्पन्न झाला की कुटुंबासह सर्वजण मानसिक ताणामुळे नैराश्यात जातात. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक बदल झाले. वेगवेगळे शोध लागले. त्यातून कॅन्सरवर अनेक शस्रक्रियांच्या माध्यमातून इलाज उपलब्ध झाले आहेत. आज ९८ टक्के कॅन्सरग्रस्त रुग्ण बरे झाल्याचा दावा केला जात आहे.

नाशिकमधील मानवता कॅन्सर सेंटर हेदेखील या दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी ठरलेला मैलाचा दगडच आहे. येथे देशातील अनेक भागातून रुग्ण शस्रक्रियेसाठी दाखल होत आहेत. अत्याधुनिक साहित्याचा वापर करून रुग्णांवर शस्रक्रिया होत आहेत. रुग्ण बरे होतायेत, पण रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढण्याची गरज असल्याचे डॉ. राज नगरकर यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी काम करायला सुरुवात केली. बड्या देशातील कॅन्सर हॉस्पिटल्सच्या तज्ञांची ते नेहमी संपर्कात राहून उपाययोजना करत असत.


त्यानंतर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ते दोन प्रयोग करत आहेत. यात पहिला म्हणजे आर्ट थेरपी आणि दुसरा म्युझिक थेरपी होय.

आर्ट थेरपीत रुग्णाला चित्र काढायला सांगितले जाते. त्यानंतर त्याच्या कल्पनाशक्तीवरून मानसोपचारतज्ञ त्याची एकूण विचार करण्याची क्षमता तपासतात. त्याअनुशंगाने त्या रुग्णावर उपचाराप्रसंगी आणि उपचारानंतर संस्कार केले जातात.

म्युझिक थेरपीदेखील असाच एक प्रकार असून यात रुग्णाला शस्रक्रिया करण्याआधी आवड-निवड विचारली जाते. त्यानंतर शस्रक्रियेच्या वेळी आणि शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला मानसिक ताण येऊ नये म्हणून त्याच्या आवडीनिवडीचे गाणे ऐकवले जातात. त्यातून रुग्ण सकारात्मकतेने विचार करतात असेही डॉ. नगरकर यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, आर्ट आणि म्युझिक थेरपीमध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध रुग्णांना सामावून घेतले जाते. अॅडमिट असलेल्या रुग्णांना तर याचा फायदा होतोच आहे. शिवाय, जे रुग्ण घरून येऊन जाऊन उपचार घेत आहेत, त्यांनादेखील रुग्णालयात आल्यानंतर फावल्या वेळात या उपक्रमात सहभागी करून घेतले जाते. त्यातून रुग्णांची आकलनक्षमता समजते त्यानुसार डॉक्टर्स उपचार करतात.

आर्ट थेरपीमध्ये प्रामुख्याने रंगांचे महत्व रुग्णाला पटवून सांगितले जाते. रुग्ण बरा होण्यासाठी कशाप्रकारे या थेरपीची गरज आहे? हे त्यांना समजवले जाते. त्यामुळे शस्रक्रियेपूर्वीच रुग्णाची भीती कमी करून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. मंडेला थेरेपीदेखील आर्ट थेरेपीचाच प्रकार असून त्याद्वारे एका कागदावर गोल-गोल काढले जातात. तिथे वेगवेगळे रंग भरण्यासाठी रुग्णाला सांगितले जाते.


रंग भरल्यानंतर रुग्णाने कशाप्रकारे रंग भरलेत. त्यामागे काय विचार केला असे, कुठल्या प्रकारचा रंग असायला हवा होता? याबाबत मार्गदर्शन करतात. हे एकप्रकारचे मेडीटेशन असते. या उपक्रमातून सर्वात जास्त रीझल्ट मिळाल्याची माहिती डॉ. सोनाली जोशी यांनी दिली.

म्युझिक थेरेपीचा उपयोग शस्रक्रियेदरम्यान तसेच रुग्णाला आयसीयुमध्ये दाखल केल्यानंतर शुद्धीवर येईपर्यंत त्याच्या आवडीचे गाणे बारीक आवाजात प्ले केले जातात. यामुळे रुग्ण जसजसा शुद्धीवर येतो तसतसा त्याला त्याच्या आवडीचे आवाज ऐकू येतात. त्यातून तो अधिक चांगल्या प्रकारे रीस्पोंड करतात, असेही डॉ नगरकर म्हणाले.

LEAVE A REPLY

*