Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पाडव्याला नाशिकमध्ये निघते रेड्यांची सवाद्य मिरवणूक; वाचा सविस्तर

Share

नाशिक | प्रतिनिधी

दिपावलीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पाडव्याच्या निमित्ताने पंचवटीत पारंपरिक पद्धतीने सायंकाळी रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेली मिरवणूक बघण्यासाठी मोठ्या संख्येने नाशिककरांनी गर्दी केली होती. तुरळक कोसळणाऱ्या पावसाच्या सरितही नाशिककरांचा उत्साह गगनाला भिडला होता.

वीरशैव लिंगायत गवळी समाज तसेच परिसरातील दुग्ध व्यावसायिकांच्यावतीने रेड्याची मिरवणूक काढण्याची गेल्या अनेक वर्षांपासून प्रथा आहे. रेड्याला मनोभावे सजवून, रंगरंगोटी करून गळ्यात पितळी घंटा, तोडे तसेच झेंडूच्या फुलांच्या माळा, अशी आकर्षक सजावट केली जाते.

अनेकदा रेड्यांच्या पाठीवर विविध देवदेवता, आकर्षक फुले, काही रेड्यांच्या पाठीवर सामाजिक संदेश देण्याचाही अनेकदा प्रयत्न केलेला दिसतो.  पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली रेड्यांची मिरवणूक पुढे दिंडोरीरोड, पंचवटी कारंजा तसेच गंगाघाट परिसरात असलेल्या श्री म्हसोबा महाराज मंदिराकडे नेण्यात येते. म्हसोबा महाराज मंदिरात दर्शनानंतर मिरवणुकीतील रेडे एकमेकांच्या समोरासमोर उभे करण्यात येतात.

या मिरवणुकीत दुग्ध व्यावसायिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. नाशिक शहरातील वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनेही दरवर्षीप्रमाणे पाडव्यानिमित्त रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली होती.

दरवर्षी निघणारी रेड्यांची मिरवणूक पहाण्यासाठी पंचवटी परीसरातील अनेक नागरिक गंगेवर दिसून आले. पारंपरिक हलगीच्या तालावर रेड्यांना फिरवण्यात येत होते. बाहेर गावाहून आलेल्य़ा पर्यटकांना वेगळी मिरवणूक पहायला मिळाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!