Video : साहेब, दंड माफ करा, मी मजूर आहे, याऐवजी हेल्मेट विकत घेण्याची मुभा द्या!

0

नाशिक । दिनेश सोनवणे

नाशिक ग्रामीण पोलिसांनी ग्रामीण भागात 1 फेब्रुवारीपासून हेल्मेट सक्ती केली आहे. हेल्मेट न वापरणार्‍या आणि सीटबेल्ट न लावणार्‍या वाहनचालकांवर ग्रामीण भागात ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. स्थानिक रहिवाशांनी मात्र या मोहिमेचे कौतुक केले असून कारवाई करून दंड करण्यापेक्षा हेल्मेट विकत आणण्याची मुभा द्यावी असे काहीजण ग्रामीण पोलिसांना सांगत आहेत. तर, एक महिना आधीच हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती केली होती, परंतु कोणीही मनावर घेतले नसल्याने कारवाई करत असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

आज निफाड पोलिसांच्यावतीने चांदोरी खेरवाडी फाटा परिसरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली. याप्रसंगी गावातील काही मंडळी रस्त्यावर येत पोलिसांच्या कारवाईला विरोध करत होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक मोरे यांनी स्थानिकांना याबाबत आधीच सांगितले असल्याचे सांगत हेल्मेट तुमच्या सुरक्षिततेसाठी असून आमचा त्यात काहीच फायदा नसल्याचे सांगितले.

त्यानंतर नागरिक नरमले, पोलीस निरीक्षकांचे म्हणणे त्यांना पटले. त्यानंतर काहीसा विरोध कमी झाला खरा, परंतु काहींनी सांगितले की, साहेब, आम्ही शेतात काम करतो, विजेचा लपंडाव नित्याचाच असल्यामुळे सारखा पंप चालू बंद करायला यावं-जावं लागतं. त्यामुळे आम्ही हेल्मेट कसं वापरायचे. तेव्हा पोलीस निरीक्षकांनी सध्या शब्दात उत्तर देत सांगितले हेल्मेट गाडीला अडकवून ठेवा, जेव्हा गाडी काढली तेव्हा हेल्मेट तुम्हाला दिसेल आणि ते तुम्ही परिधान करून प्रवास करा. तुमचे डोकेही शाबूत राहील आणि पोलीस दंडही करणार नाहीत.

त्यांनतर एकजण म्हणाला, साहेब आम्ही मजुरी करतो तुम्ही आताच पाचशे रुपयांची पावती फाडली, सांगा काय भावात पडलं आम्हाला. यावर दुसर्‍या एकाने सांगितले की, पाचशे रुपये दंड आकारण्यापेक्षा पोलिसांनी पावती न फाडता थेट हेल्मेटच द्यावे.

एकजण म्हणाला, पाचशे रुपयात काय हेल्मेट येते का?, चांगले आयएसआय मार्क असलेले हेल्मेट विकत घ्या आणि अशा कारवाईपासून कायमची सुटका मिळवा. शिवाय अपघातातून जीवही वाचेल. पोलीस निरीक्षकांनी उपस्थित नागरीकांना हेल्मेटचे महत्त्त्व विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले. त्यानंतर मात्र वातावरण निवळले. गपचूप काहींनी पावत्या फाडल्या आणि चूक मान्य करत मार्गस्थ झाले.

कारवाईपासून कुणाचीही सुटका नाही. कारवाई हंगामीही नाही. नियमित सुरु राहणार आहे, त्यामुळे हेल्मेट वापर, सीटबेल्टचा नियमित वापर हाच नियमित घडत असलेल्या अपघातापासून वाचण्याचा एकमेव पर्याय असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी याप्रसंगी सांगितले.

हेल्मेट वापरणार्‍यांना गुलाबपुष्प

विना हेल्मेट चालकांवर कारवाई सुरु असताना पोलीस निरिक्षकांना हेल्मेट परिधान केलेले चालक दिसले. कारवाईच्या गोटात असलेले मोरे साहेब चटकन बाहेर आले. दुचाकीस्वाराजवळ जात त्यांनी गुलाबपुष्प देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच दुचाकीस्वारानेही हेल्मेट वापरा, खुप चांगले वाटते असे सांगत पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांनी काळजी घ्या

निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात महाविद्यालयांची संख्या जास्त आहे. नियमित पंचक्रोशीतून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेक अपघातात महाविद्यालायीत विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. निफाड तालुक्यात पक्षी अभयारण्य असलेले नांदूरमध्यमेश्वरदेखील आहे. इथे भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या लक्षणीय असते.गेल्या वर्षात जिल्ह्यात 377 मृत्यू हेल्मेट नसल्याने झाले आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*