Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मूर्ती अन् माझ्यात एक नाते

Share

नाशिक | श्रीया कुलकर्णी

शाडूमातीचा गणपती हा पर्यावरणपूरक आहे. गणपती आणि माझे नाते हे 2003 पासून सुरू झाले. सर्वप्रथम 2003 मध्ये मी गणपती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यावेळी माझ्या मदतीला माझी मुले होते. त्यावेळी ते लहान असल्यामुळे त्यांनादेखील गणपती बनविताना हौस वाटत होती. गणपती बनविताना मला एक वेगळा उत्साह जाणवला आणि ध्यानस्त वाटले. गणपती बनत असताना मूर्ती आणि माझ्यात एक नाते तयार झाले आणि तेव्हापासून मी गणपती बनविते.

पर्यावरण वाचविण्याचे विचार मनात सलत असल्याने शाडूमातीपासून गणपती बनविणे आणि त्याच्या कार्यशाळा घेणेे ही संकल्पना सुचली. आपण कायम म्हणतो सरकारने, महानगपालिकेने काहीच केले नाही. एखादी आपत्ती आली किंवा पूर आला तर आपण कायम सरकारला किंवा प्रशासनाला दोषी मानतो.

मात्र आपण काय करू शकतो, याचा विचार करीत नाही. आपण कायम इतरांवर आरोप करतो, मात्र समाज बदलण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो, याचा विचार करत नाही. त्यामुळे समाजात बदल आणायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी, या विचाराने मी माझे मुले, घरातील नातेवाईक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना गणपती बनविणे शिकवले.

त्यानंतर अनेक शाळांमधून मला गणपती बनविण्याविषयी माहिती देण्यासाठी बोलावण्यात आले. त्या ठिकाणी मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने मुलांना गणपती बनविण्याची माहिती देते. समाजात बदल घडविण्यासाठी दुसर्‍यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करावी.

गणपती बनविण्याची प्रक्रिया मला आनंद देते. शाळांमध्ये मार्गदर्शन करताना मी प्लास्टर ऑफ पॅरिस न वापरण्याचा सल्ला देते. कारण प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नदीत असणारे नैसर्गिक झरे बुजतात आणि नदी प्रदूषित होते. तसेच नदीतील जीव मरतात. हे टाळण्यासाठी शाडूमातीच्या गणपतीचा वापर करावा. या गणपतीचे विसर्जन आपण घरी बदलीमध्ये देखील करू शकतो. विसर्जित झालेली माती आपण झाडांमध्येदेखील वापरू शकतो.

हा गणपती बनविल्यानंतर त्याला वाळायला सात ते आठ दिवस लागतात. वातावरण कोरडे असेल तर गणपती लवकर वाळतो. आम्ही आठ टप्प्यांमध्ये गणपती बनवतो. पहिले त्याचे आसन, नंतर पाय, त्यानंतर पोटाचा भाग, नंतर छाती, हात, सोंड, मुकुट आणि अखेर दागिने बनवतो. गणपती वाळल्यानंतर मी त्याला पूर्ण पांढरा रंग देते.

त्यानंतर विविध रंग देते. गणपतीच्या सजावटीसाठीदेखील आपण नैसर्गिक वस्तूंचा जसे पाने, फुले, कागद, कापड, दगड, माती याचा वापर करू शकतो. कार्यशाळेच्या माध्यमातून एका दिवसात 500 मूर्ती तयार होतात. यामध्ये चार वर्षांच्या लहान मुलांपासून ते 70 वर्षांच्या आजींपर्यंत लोक सहभागी होतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!