Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

क्रशरमधून उडणारी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना करणार 

Share
शिवडे ।  सुपीक जमिनीवर नांगर फिरवत शेतकऱ्यांना उद्धवस्थ करू पाहणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून ठेकेदाराने उभारलेल्या खडी क्रेशरने शिवडे परिसरातील शेतीपिकांना धुळीचा उपद्रव होत असून त्यामुळे उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
परिसरातील खडी क्रेशरला दिलेली परवानगी रद्द करावी असा ठराव ग्रामसभेने केल्यावर जागे झालेल्या प्रशासनने आज (दि. १२) तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली खरी पण या बैठकीत शेतकऱ्यांपेक्षा समृद्धीचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीलाच झुकते माप देण्यात आले. क्रेशरमधून उडणाऱ्या धुळीने पिकांना उपद्रव होऊ नये यासाठी प्लांटच्या भोवताली १५ मीटर उंचीपर्यंत जीआय शीटचे पत्र्याचे जाळीदार आवरण टाकण्यात येईल असे सांगून ठेकेदाराने वेळ मारून नेली आहे.
हैद्राबाद येथील बीएससीपीएल या कंपनीने सोनारीपासून इगतपुरी तालुक्यायातील समृद्धी निर्माणाचे काम घेतले आहे. या कंपनीमार्फत शिवडे परिसरात खडी क्रेशरची उभारणी करण्यात आली असून रस्त्याच्या कामाला अधिकृत सुरुवात झाली नसली तरी पूर्वतयारी म्हणून ठेकेदाराकडून सज्जता करण्यात येत आहे. खडी क्रेशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे लगतच्या शेतकऱयांना नुकसान सोसावे लागत आहे.
रात्रंदिवस सुरु असलेल्या क्रेशरमधून उडणाऱ्या धुरळ्याचे आच्छादन पिकांवर बसले असून त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष, भाजीपाला पिके व अंब्याच्या झाडांना लागलेल्या मोहोराचे नुकसान होत आहे. याबाबत वारंवार सांगूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव करून शिवडे परिसरात उभारण्यात आलेले क्रेशर व त्यांची परवानगी रद्द करण्याची मागणी केली. या बाबत तहसीलदार गवळी, प्रांताधिकारी पाटील यांना निवेदने देऊनही दखल न घेतली गेल्याने जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले.
शेतकरी पुन्हा आक्रमक होण्याची भीती असल्याने जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाने आज दि.१२ तहसीलदार गवळी यांनी तहसील कार्यालयात शिवडे येथील शेतकरी व ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला सोसायटीचे चेअरमन मधुकर हारक, दत्तात्रय वाघ, रोहिदास वाघ, पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण हारक, अशोक वाघ, रावसाहेब हारक, उत्तम हारक, सुनिल वाघ, भगवान वाघ, शेवंताबाई वाघ, फुलाबाई वाघ, लंका वाघ आदी शेतकरी उपस्थित होते.
क्रेशरसाठी लागणारा दगड परिसरातील खोदकाम करून उपलब्ध केला जात आहे. यासाठी सुरुंग लावून स्फोट घडवण्यात येतात. त्यामुळे जमिनीला हादरे बसत असून भविष्यात परिसरातील विहिरींचे पाणी देखील नाहीसे होण्याची भीती आहे. शिवाय हदऱ्यांमुळे घरांना नुकसान होऊ शकते याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. क्रेशरमधून उडणारी धूळ आरोग्यास अपायकारक आहे शिवाय आतापासूनच पिकांना धोका निर्माण झाला आहे. रस्त्याचे काम पुढचे किमान चार वर्षे चालेल असे विचारात घेतले तर आमच्या सुपीक जमिनी नापीक  होतील.
विहिरीचे पाणी नाहीसे होईल या धोक्यांकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. इतरांच्या समृद्धीसाठी आम्ही का उद्धवस्थ व्हावे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या कामासाठी मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून उघड्यावरच लोटेपरेड सुरु असल्याने दुर्गंधीचा सामना देखील करावा लागत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी उपस्थित बीएससीपीएलचे अधिकारी अभिषेक दुबे यांनी कंपनीची बाजू मांडताना यापुढे रहिवाश्याना व शेतीपिकांना अपाय होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात येईल याकडे लक्ष वेधले. क्रेशर मधून उडणारी धूळ स्प्रिंक्लरद्वारे पाण्याचे फवारे उडवून जागेवर खाली बसवण्यात येईल. याशिवाय परिसरातील रस्त्यावर वाहनांमुळे धूळ उडू नये यासाठी टँकरच्या सहाय्याने पाणी मारण्यात येईल असे ते म्हणाले.
क्रेशरच्या भोवती १५ मीटर उंचीचे पत्र्याचे जाळीदार आवरण लावून धुळीला प्रतिबंध करण्यात येईल असे दुबे यांनी सांगितल्यावर तहसीलदार गवळी यांनी उपायोजना केल्या जाणार असल्याने शेतकऱ्यांनी विरोध न करण्याचे आवाहन केले. परिसरातील पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला जाईल व शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासंदर्भात मागणी करण्यात येईल असे सांगून त्यांनी बैठक आटोपती घेतली.
अन्यथा संघर्ष अटळ 
समृद्धीमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्यांची जाणीव असल्यामुळेच शिवडे येथील शेतकऱ्यांचा प्रकल्पालाच विरोध होता. अर्थात हा विरोध कमी करण्यात प्रशासन यशस्वी ठरले असून शेतकऱ्यांनी देखील जमिनी देण्यास संमती दिली. प्रत्यक्ष काम सुरु होण्याआधीच आमच्या राहिल्या-साहिल्या जमिनींची सुपीकता कमी करण्याचा घाट घातला जातो आहे. घुळीमुळे माणसे व जनावरांचे आरोग्य धोक्यात येणार असून पिकांचे देखील नुकसानच होणार आहे.
सुरुंगाच्या स्फोटामुळे जमिनीत कंपने निर्माण होत असून मालमत्तांच्या नुकसानीसह विहिरींचे पाणी गायब होण्याचीही भीती आम्हा शेतकऱ्यांना सतावत आहे. तहसीलदारांनी केवळ आश्वासनावर बोळवण केली आहे. प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा अन्यथा पुन्हा संघर्ष करावा लागेल असा इशारा रोहिदास वाघ या शेतकऱ्याने दै. देशदूतशी बोलताना दिला.
ब्लास्टिंगची परवानगी कोणी दिली ? 
समृद्धीसाठी ठिकठिकाणी खाजगी मिळकती ठेकेदाराने खरेदी केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांशी करार केले आहे. या जागेतून महामार्ग उभारणीसाठी आवश्यक असणारा दगड काढण्यात येत असून त्यासाठी खोदकाम करताना जमिनीत खोलवर ब्लास्टिंग केले जात आहे. ब्लास्टिंगसाठी ठेकेदाराला परवानगी कोणत्या अटीवर देण्यात आली. याबद्दल तहसीलदार गवळी यांना शेतकऱ्यांनी छेडले असता आमच्याकडून अशी परवानगी दिली गेली नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. गौणखनिज उत्खनन व वाहतूक परवाना तहसीलदार देतात.
मग समृद्धीसाठी ठेकेदार विनापरवानगी ब्लास्टिंग करतोय का ? नसल्यास स्फोटकांचा वापर केला जात असणारी ही परवानगी कोणी दिली असे विचारल्यावर चौकशी करून सांगतो असे उत्तर तालुक्याची जबाबदारी वाहणाऱ्या तहसीलदारांनी दिल्यावर उपस्थित शेतकरी अवाक झाले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!