येवला तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र; कानडीला जीव धोक्यात घालून महिला काढतात विहिरीतून पाणी

0

विखरणी | वार्ताहर

येथून जवळच असलेल्या कानडी येथे दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाईवर त्वरीत उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

जीवाची परवा न करता महिला अतिखोल विहिरीच्या कठड्याजवळ जाऊन पाणी दोरीने ओढून काढताना दिसून येत आहेत. मैलोंमैल चालून डोक्यावर पाणी आणावे लागत असल्यामुळे दुष्काळाची प्रचंड दाहकता आतापासूनच याठिकाणी जाणवत आहे.

कानडी येथे पाणीपुरवठा करण्यासाठी पाटोदा येथे विहीर खोदण्यात आली आहे. मात्र सध्या कानडी ग्रामपंचायतच्या विहिरीला पाणी नसल्याने पाटोदा येथील विहिरीवरून तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा दोन चार दिवसाआड कमी दाबाने होत आहे.

त्यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यात यावा, तसेच पाटोदा येथुन पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा आणि या दुष्काळातून दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.

पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे महिलाना पाणी आणण्यासाठी ठाणगाव रस्त्यावर असणाऱ्या विहिरीवर उन्हातान्हात दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

सकाळ पासून संध्याकाळपर्यंत फक्त पाण्यासाठीच वणवण करत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  आत्ताच पाण्यासाठी ही वेळ आली आहे तर पुढील चार महीने कसे जातील असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.

येथील पाणीटंचाई कायमची निकाली काढण्यासाठी कानडीचा पाणीपुरवठा ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला जोडून हा प्रश्न निकाली काढावा व येथील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवावी अशी मागणी येथील महिलांसह ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*