
नाशिकरोड | आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात गती आलेल्या अतिक्रमण निर्मुलन मोहीम नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या काळातदेखील तशाच प्रकारे सुरु आहे. आज महापालिकेने नाशिकरोड परिसरात अतिक्रमण निर्मुलन मोहीम नाशिकरोड विभागातील हनुमान नगर चेहडी सामनगांव रोड परिसरात राबविण्यात आली. जवळपास ८० ते ९० कच्चे व पक्क्या बांधकामातील झोपडया हटविण्यात आल्या.
गेल्या अनेक दिवसापूर्वी याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने सदर कारवाई केली. यापूढे सहाही विभागांमध्ये अशा प्रकारे ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इ. ठिकाणी अतिक्रमणे करुन व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. तसेच संबंधितांवर गुन्हादेखील दाखल केला जाईल असा इशारा महापालिकेने दिला आहे.
ही कारवाई आयुक्त राधाकृष्ण गमे व अति. आयुक्त (शहर/सेवा) हरीभाऊ फडोळ व उपआयुक्त (अति.) रोहीदास बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, नितीन नेर, जयश्री सोनवणे, एम.डी. पगारे (अधिक्षक/अति.मुख्यालय), नगरनियोजन विभागाचे अभियंता विशाल गरुड, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ढोकणे यांच्यासह पोलिसांचे पथक, वाहतुक पो.निरीक्षक बामरे व त्यांचे पथक, अतिक्रमण विभागाचे 6 पथके, 2 जे.सी.बी. व दैनंदिन अतिक्रमण निमुर्लन पोलीस बंदोबस्त यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली.