Video : बॉक्स क्रिकेटला नाशकात ‘सुगीचे दिवस’

0

नाशिक | जयश्री साळुंके-काकड

गल्ली क्रिकेटपासून दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानापर्यंत क्रिकेटची ओळख सर्वांनाच ज्ञात आहे. कुठलाही खेळ खेळायचा असेल तर पटकन कुणाच्याही तोंडून क्रिकेट खेळू असा आवाज येतो. दिवसेंदिवस शहर वाढत गेले. जागेच्या अभावामुळे खेळांवर मर्यादा आल्या, मात्र शहरातील नागरिकांच्या गरजा ओळखून नाशिकमध्ये अनेक ठिकाणी बॉक्स क्रिकेट संकल्पना उदयास आली असून यातून आर्थिक उलाढालदेखील मोठी होत आहे.

शहरातील आरटीओ परिसर, पंचवटी, नवीन नाशिक परिसरात बॉक्स क्रिकेट खेळले जात आहे. याठिकाणी सकाळपासूनच क्रिकेट तसेच फुटबॉल खेळण्यासाठी गर्दी होते.  बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या संघाला तासावर भाडे द्यावे लागत असल्यामुळे आर्थिक उलाढालही मोठी होत आहे.

विशेष म्हणजे, येथे नियमित येणाऱ्या खेळाडूंसाठी किंवा टीमसाठी प्रशिक्षक देखील असतात. तसेच या मैदानाची देखभाल, अंपायर यांनादेखील यातून रोजगार मिळाला आहे. नाशिकमध्ये क्रिकेट आणि फुटबॉल एकाच मैदानात खेळवले जातात.

सध्याचा काळ हा हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करणारा आहे, म्हणजेच व्यायाम करण्यासाठी मोठ्या मैदानावर क्रिकेट खेळणारे जेष्ठदेखील बॉक्स क्रिकेट खेळून स्वतःच्या शरीराची कसरत करत घामाघूम होतात.

अनेक महाविद्यालयीन तरुणींमध्येदेखील बॉक्स क्रिकेट लोकप्रिय झाले असून फावल्या वेळात ते आपल्या टीमसह क्रिकेटचा आनंद घेताना दिसून येतात. मुलींची वाढलेली संख्या बघता बॉक्स क्रिकेटच्या संचालकांनीदेखील मुलीसाठी शिकवणीप्रमाणे वेगळी वेळ ठरवून दिली आहे.

अनेक मैदानांवर शहरातील क्षेत्रानुसार दर आकारले जातात. त्यात सकाळी आणि सायंकाळी जास्त भाडे आकारले जाते. तर सुट्टीच्या दिवशी गर्दी वाढत असल्यामुळे या दिवशीचे भाव वाढवले जातात. एका मैदानातून अंदाजे सव्वा ते दीड लाखांचे उत्पन्न सध्या मिळत आहे. अलीकडे अनेक जिल्हास्तरीय स्पर्धादेखील बॉक्सक्रिकेटमध्ये भरवल्या जाऊ लागल्या आहेत.

देखभाल तसेच प्रथमोपचार 

मैदान व्यावसायिकांना वेळोवेळी मैदानाची देखभाल करावी लागते. नेट्स वेळो वेळी बदलणे, ग्रास कटींग, सुरक्षा, यांची देखभाल केली जाते. अनेक खेळाडू खेळत असताना जखमी होतात तेव्हा त्यांना प्रथमोपचारदेखील याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात.

हे होतात फायदे

लहानशा मैदानात आजूबाजूला आणि वरून नेट लावले जाते. त्यामुळे चेंडूला कितीही जोराचा फटका मारला तरी तो मैदानातच पडतो. त्यामुळे कमी खेळाडू जरी असतील तरी तिथे खेळ खेळता येतो. कमी वेळात जास्तीत जास्त कसरत येथे होते.

निरोगी आरोग्यासाठी लाभदायी

या प्रकारच्या सुविधांमुळे 6000 स्क्वेअर फूट क्षेत्रात खेळण्यासाठी छोट्या ग्रुप्सना संधी मिळते. याच बरोबर कोचिंग सुविधा ही उपलब्ध आहेत. या प्रकारच्या सुविधांमुळे तरुण पुन्हा खेळाकडे वळू लागले असून यानिमित्ताने आरोग्य संवर्धनाचे काम होते.

केयूर अंबीकर, संचालक

LEAVE A REPLY

*