‘बोगदा’ चित्रपटातील संयमी सुहास ताई

0
कोणताही सिनेमा पडद्यावर पाहताना जेवढा उत्कृष्ट भासतो त्याहीपेक्षा वेगळे अनुभव तो बनत असताना कलाकार आणि इतर मंडळींना येत असतात. या ऑफ स्क्रिन अनुभवांतूनच बऱ्याचदा कलाकार हा समृद्ध होत असतो. ‘बोगदा’ सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान असेच काहीसे  अनुभव ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना आले.
या सिनेमातील एका महत्वपूर्ण सीनसाठी सुहास यांना गोलाकार बोटीत बसायचे होते. नदीच्या एका किनाऱ्यावरून ती बोट (चप्पू) दुसऱ्या किनाऱ्यावर जाते, असे ते शुटींग होते. पडद्यावर आकर्षक वाटणारे हे दृश्य वास्तव्यात साकारताना सुहास यांना थरारक अनुभव आला. बोट गोलाकार असल्याने त्यात फक्त नावाडी आणि सुहास जोशीच बसू शकत होत्या, त्यात जर थोडी चूक झाली, तर बोटीचा तोल जाण्याची दाट शक्यता होती.
अश्यावेळी त्यांच्या संयमतेचा प्रत्यय सर्वांनाच आला. साठीच्या सुहास ताई चित्रीकरणासाठी बोटीत बसल्या असताना, बोट पाण्यात उलटू नये यासाठी खालच्या बाजूला दोन टायर लावण्यात आले होते. मात्र बोट काही अंतर दूर गेल्यानंतर तिचा एक टायर फुटला. त्यामुळे, अचानक समतोल बिघडल्याने  बोट पाण्यात हेलकावे  घेऊ लागली.
दरम्यान, सर्व टीमने धावपळ करत दोरीने बोट पुन्हा किनाऱ्यावर सुखरूप आणण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. सुहास ताईचे वय लक्षात घेता, त्या घाबरून पाण्यात पडू शकल्या असत्या. मात्र, त्यांनी न डगमगता संयमाने ती परिस्थिती हाताळली. इतकेच नव्हे, तर पुढच्या रिटेकसाठी त्या तयारदेखील झाल्या होत्या. ‘बोगदा’ सिनेमातील हा सिन प्रेक्षकांना नक्कीच भावूक करणारा ठरेल असा आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर सुहास जोशी यांनी मराठी आणि हिंदीमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.  येत्या ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत असलेल्या ‘बोगदा’ चित्रपटातून सुहास जोशी यांच्या याच कलागुणकौशल्याचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान सिनेमाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केले असून, नितीन केणी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाच्या निर्मितीची धुरा करण कोंडे,  सुरेश पानमंद, नंदा पानमंद आणि निशिता केनी यांनी सांभाळली आहे.

LEAVE A REPLY

*