Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

माणिकराव कोकाटे स्वगृही परतणार?

Share

नाशिक । प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी पूर्वी इच्छुक रांगा लावत. मात्र, वैभवाचे दिवस गेले असून बुधवारी (दि. 31) पक्षाच्या मुलाखतीस अल्प प्रतिसाद मिळाला.

15 मतदारसंघासाठी केवळ 44 इछुकांनी मुलाखतीं देत निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शवली. शहरी मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असली तरी, ग्रामीण भागातील मतदारसंघातून इच्छूक मुलाखतींकडे पाट फिरवली आहे. असे असतानाही मुलाखती घेण्यासाठी दाखल झालेल्या आमदार भाई जगताप यांनी जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघासाठी 44 जणांनी मुलाखती दिल्याचा दावा केला आहे.

प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुकांचे अर्ज मागवले होते. पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखती राज्यभर घेण्यात येत आहेत. बुधवारी (दि.31) आ. जगताप व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी जिल्ह्यातील 15 मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. शहरातील पश्चिम मतदारसंघातून लक्ष्मण जायभावे, केशव अण्णा पाटील, नाशिक पूर्वमधून विजय राऊत, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी मुलाखती दिल्या.

नाशिकमध्य मतदारसंघात मात्र, इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी दिसून आली. महापालिकेतील गटनेते शाहू खैरे, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे आदींसह 4 इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे समजते. देवळाली मतदारसंघातून किरण जाधव, नंदकुमार कर्डक यांनी मुलाखत दिली.

ग्रामीणमध्ये निराशा

ग्रामीण भागातील मतदारसंघात मात्र निराशाजनक चित्र दिसून आले. मुलाखतीसाठी इच्छुकांना पूर्वकल्पना दिलेली नसल्याने अनेकांना ऐनवेळी मोबाईल करून बोलावले जात होते. त्यात अनेकांचे अर्जही केलेले नसताना त्यांना बळजबरीने बोलावून घेत मुलाखतीस बसविले जात होते. दिंडोरीचे तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड यांनी तर मतदारसंघातील 10 इच्छुकांच्या उमेदवारांची यादीच निरीक्षकांकडे सादर केल्याचे समजते. प्रत्यक्षात हे इच्छुक हजरही नसल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दावा ठोकलेल्या नांदगाव, निफाड, येवला या मतदारसंघातील इच्छुक मात्र फिरकलेही नसल्याची चर्चा येथे रंगली होती. चांदवड-देवळा मतदारसंघातून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संतप वक्ते यांनी मुलाखत दिली. मालेगाव बाह्यमधून जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मुलाखत दिली असून ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सिन्नर विधानसभा मतदारसंघातून तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी मुलाखत दिली. कळवण-सुरगाणा मतदारसंघातून नगराध्यक्ष मयूर बहिरम, रमेश कहांडोळे, काशिनाथ गायकवाड मुलाखतीस अल्प प्रतिसाद लाभलेला असूनही आमदार जगताप यांनी 15 विधानसभा मतदारसंघासाठी 44 जणांनी मुलाखती दिल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुलाखती घेऊन हा अहवाल प्रदेशला सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उल्हास पाटील, डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, युवक शहराध्यक्ष स्वप्नील पाटील, वत्सला खैरे, हेमलता पाटील, डॉ. सुचेता बच्छाव, दिनेश बच्छाव, दिगंबर गिते उपस्थित होते.


आ. गावितांनी दिली मुलाखत

आमदार निर्मला गावित या भाजपवासी होणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आमदार गावित यांनी दुपारी येत इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत दिली. याशिवाय जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित यांनीही मुलाखत दिली. मालेगाव मध्यमधून आमदार आसिफ शेख यांनी मुलाखत दिली. या दोन्ही मतदारसंघातून एक-एकच इच्छुक आहेत.


कोकाटे स्वगृही?

सिन्नर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र, सद्यस्थितीत ते कोणत्याही पक्षात नाही. त्यामुळे कोकाटे काँग्रेसकडून लढणार असल्याची चर्चा यावेळी होती. त्याबाबत त्यांनी आमदार जगताप यांच्याशी मोबाईलवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.


सात मतदारसंघांवर दावा

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जिल्ह्यात राष्ट्रवादी 10 तर काँग्रेसच्या वाट्याला 5 मतदारसंघ आहेत. मात्र, यावेळी मतदारसंघात आदलाबदल करण्याची मागणी आम्ही करणार आहे. याशिवाय जागावाटपात 7 मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी करणार असल्याचे आमदार भाई जगताप यांनी सांगितले. यामध्ये नाशिक मध्य, नाशिक पूर्व, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, मालेगाव मध्य, सिन्नर हे मतदारसंघ पक्षाकडे होते. याशिवाय चांदवड-देवळासह आणखी एक मतदारसंघ मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


दमदाटीतून ‘मेगा’भरती

भाजपतील मेगाभरतीवर विचारले असता, आमदार जगताप यांनी विरोधकांच्या आमदारांना दमदाटी व कारवाईचा धाक दाखवून भाजपत प्रवेश करून घेतले जात असल्याचा आरोप केला. नेत्यांना ईडीच्या धमक्या देऊन दहशत पसरवून मजबूर केले जात आहे. सत्तेसाठी राजकारणाची पातळी कधी नव्हे ती इतकी घसरली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!