लेखक श्याम मनोहर यांची उद्या नाशकात मुलाखत

0

नाशिक (प्रतिनिधी) : मनुष्यस्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लेखन करणारे सुप्रसिद्ध लेखक श्याम मनोहर यांच्या जाहीर मुलाखतीचे नाशकात आयोजन करण्यात आले आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे नाशिक विभागीय केंद्र आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध कवी, समीक्षक, अनुवादक डॉ. चंद्रकांत पाटील श्याम मनोहर यांची मुलाखत घेणार आहेत.
शुक्रवार (दि.24) सायंकाळी 6 वाजता कुसुमाग्रज स्मारक गंगापूररोड येथील स्वगत हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

‘उत्सुकतेने मी झोपलो’ या कादंबरीसाठी श्याम मनोहर यांना 2008 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. शंभर मी या कादंबरीसाठी श्याम मनोहर यांना राष्ट्रीय पातळीवरील कुसुमांजली पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. बंगलोर येथील कुवेंम्पु पुरस्काराचेही ते मानकरी आहेत.

त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या कादंबऱ्या आणि नाटकांना नाट्यदर्पण तसेच महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही मिळाले आहेत.

श्याम मनोहर यांच्या साहित्यात प्रामुख्याने सभ्यता आणि संस्कृती या दोन विषयांचा धांडोळा घेतलेला असतो. जगण्याची पद्धत, जगण्याची व्यवस्था, मानवी संबंध, इच्छा, आकांक्षा त्यांच्या पूर्तीचे मार्ग इत्यादींचा समावेश श्याम मनोहर सभ्यता या संकल्पनेमध्ये करतात.

सृष्टी, निर्माता, जीवनरहस्य इत्यादी अज्ञात बाबींचा शोध श्याम मनोहर संस्कृती या संकल्पनेमध्ये करतात.  संस्कृतीचा अर्थात अज्ञाताचा शोध सभ्यतेला विकसीत करतो, अशी त्यांची धारणा आहे. फिक्शनने अर्थात साहित्याने संस्कृतीचाही शोध घ्यायचा असतो.

कारण जाणीव, कुतुहल, जिज्ञासा आणि शोध घेण्याची प्रेरणा हे सर्वश्रेष्ठ मानवी मूल्य आहे अशी श्याम मनोहर यांची धारणा आहे. आपल्या सर्वांना आपल्या स्वभावाचा त्रास होतो. तिला तिच्या स्वभावाचा त्रास होतो. मला माझ्या स्वभावाचा त्रास होतो. एवढी काय गं आपण आपल्या स्वभावाला किंमत देतो, असा प्रश्न यकृत नाटकातील एक पात्र विचारतं.

तर हृदय या नाटकातलं पात्र म्हणतं, अधिकारपद मिळो न मिळो, मोक्याचं ठिकाण मिळो न मिळो, पहिला नंबर येवो न येवो, जीवनात अस्सल काम करता यायलाच पाहीजे, अशी जगायची पद्धत शोधून काढली पाहीजे.

श्याम मनोहर यांनी मराठी साहित्यात सभ्यता आणि संस्कृती ह्या संकल्पनांची वेगळ्या प्रकारे मांडणी केली आहे. या मांडणीनुसार त्यांची कळ ही कादंबरी मराठीतील पहिली संस्कृतीवादी कादंबरी ठरते. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर गौरवलेल्या या लेखकाची मुलाखत, लेखक, कलावंत, नाट्य व चित्रपटकर्मी आणि वाचक या सर्वांसाठी आनंदाची पर्वणी आहे.

तरी या मुलाखतीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा,  अ‍ॅड.नितीन ठाकरे तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह मकरंद हिंगणे, विश्वस्त विनायक रानडे आदिंनी केले आहे.

LEAVE A REPLY

*