Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

प्रेमसंबंधाला विरोध करत खंबाळे येथील तरुणाला बेदम मारहाण; ऍट्रासिटी अंतर्गत ७ जणांवर गुन्हा दाखल

Share
सिन्नर । वार्ताहर  
दलित समाजातील तरुणासोबत असणारे प्रेमसंबंध अमान्य करत तरुणीच्या नातेवाईकांनी सदर तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना नाशिक – पुणे महामार्गावरील गोंदे फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी दि.२७ दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली आहे. मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर तरुणाच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात गोंदे  व दोडी येथील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल साहेबराव भालेराव (२४) रा. खंबाळे या तरुणाचे गोंदे येथील तरुणीशी प्रेमसंबंध असून ते दोघे कोर्टात जाऊन लग्न करणार होते. मात्र राहुल हा दलित समाजातील असल्याने सदर तरुणीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता.
सोमवारी दुपारी राहुल एमएच ०४/ जेए २२६ या क्रमांकाच्या दुचाकीवरून सिन्नरकडे जात असताना गोंदे फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सचिन सुरेश आव्हाड, सुरेश विठ्ठल आव्हाड, रामदास आव्हाड, मंगेश, गौरव, व सोमनाथ सर्व रा. गोंदे  व दोडी येथील पोलीस पाटील सुदाम पाटील यांचेसह इतर अनोळखी ७ ते ८ जणांनी त्यांची गाडी आडवी लावून राहुलची दुचाकी थांबवली.
त्याला जवळच असलेल्या नटराज सांस्कृतिक कला केंद्राच्या पाठीमागे ओढत नेऊन सर्वांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्याची दुचाकी फोडून टाकली, मोबाईल फोन हिसकावून घेत सिमकार्ड तोडून टाकले. यानंतर सदर मुलीच्या घरासमोर नेऊन राहुलला पुन्हा मारहाण करण्यात आली.
जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या मुलीसोबत लग्न करायची तुझी लायकी नाही असे सांगत धमकावले. राहुलला पोलिसांकङे न नेता रस्त्यात एखाद्या वाहनाखाली टाकून द्या असेही मारहाण करणारे म्हणत होते.
याबाबत नातेवाईकांना समजल्यावर गोंदे फाटा परिसरातून जखमी अवस्थेत राहुलला ताब्यात घेण्यात आले. त्याला उपचारासाठी तातडीने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला असून वावी पोलीस ठाण्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाडचे पोलीस उपाधीक्षक माधव पडिले याप्रकरणी तपास करीत आहेत.
दोघांना अटक  
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. यात संबंधित तरुणीचे वडील व भाऊ यांचा समावेश आहे. त्यांना आज दि.२९ न्यायालयासमोर उभे केले असता दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मारहाणीच्या प्रकरणात सहभागी अन्य संशयितांची नावे अर्धवट असल्याने तपासात ती निष्पन्न करण्यात येतील व त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असे तपास अधिकारी डीवायएसपी पडिले यांनी सांगितले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!