Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ आजपासून एकेरी वाहतूक; हे आहेत पर्यायी मार्ग

Share
नाशिक । अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या मार्गाचे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पुढील महिनाअखेर पूर्ण करावयाचे असून यासाठी आजपासून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्र्यंबक नाक्यापासून अशोक स्तंभावर जाण्यासाठी आता फक्त एकेरी वाहतूक सुरु राहणार आहे. तर रविवार कारंजा, रेडक्रॉस, शालीमार मार्गे नियमित एकेरी वाहतुकीचा पर्याय नाशिककरांना वापरता येणार आहे. अचानक वाहतूक शाखेकडून अधिसूचना जारी करण्यात आली असून सकाळी दहा वाजेपासून दुहेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दिवाळीपूर्वी याच मार्गावर दोन दिवसांचा प्रायोगिक तत्त्वावर वन-वे’ चा प्रयोग करण्यात आला होता. आता काम पूर्ण होईपर्यंत हा मार्ग वन वे(एकेरी) राहणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत त्र्यंबकनाका-अशोकस्तंभ या रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाच्या एका बाजुकडील काम सुरू आहेत तर दुसर्‍या बाजुच्या मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे.

रस्त्याच्या कामामुळे या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीची भीषण समस्या आहे. त्यामुळे यातून पर्याय म्हणून दिवाळीपूर्वी 23 व 24 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या मार्गावर एकेरी वाहतुकीचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर ऐनदिवाळीतील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सदरचा निर्णय मागे घेण्यात आला होता.

परंतु, आता वाहतूक शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा मार्ग स्मार्ट रोडचे काम पूर्णत्वास जाईपर्यंत एकेरी वाहतुकीसाठीच वापर केला जाणार आहे. यानुसार आवश्यक त्या उपाययोजना महापालिका व कंत्राटदार यांनी या मार्गावर केल्या आहेत.

त्यानुसार आजपासून या मार्गांवरील वाहतुक वळविण्यात आली आहे. आज रविवार असल्याने वाहनांची गर्दी दुपारी कमी होती. यामुळे प्रारंभी माहिती नसलेल्या काही वाहनांना वळून दुसर्‍या मार्गाने जावे लागते. परंतु याचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र सांयंकाळी गर्दी वाढल्यानंतर ठिकठिकाणी वातुक कोंडी झाल्याचे चित्र होते. यापुढे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे.

असे आहेत पर्यायी मार्ग

  • पंचवटीकडून येणार्‍या वाहनांना मध्यवर्ती बसस्थानक, त्र्यंबकनाका, सिडको-सातपूरकडे जावयाचे असल्यास, रविवारी कारंजा, सांगली बँक, शालिमार, शिवाजीरोड, सीबीएस असे जावे. तर त्र्यंबकनाक्याकडे जायचे असल्यास शालिमार, खडकाळी, जिल्हा परिषदमार्गे त्र्यंबकनाका मार्गस्थ होता येईल.
  • गंगापूर रोड वा रामवाडी पुलाकडून येणार्‍या वाहनांना मेहेर सिग्नल, त्र्यंबकनाका जायचे असल्यास अशोकस्तंभ, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल असे जावे.
  • मध्यवर्ती बसस्थानक जायचे असल्यास अशोकस्तंभ, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, शालीमार, शिवाजीरोड, सीबीएस जावे.
  • सिडको-सातपूर जायचे असल्यास अशोकस्तंभ, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, शालिमार, खडकाळी सिग्नल, जिल्हा परिषद रोड, त्र्यंबकनाका, सातपूर-सिडको जावे. अथवा, गंगापूरनाका, कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी मार्गे सीबीएस वा सिडको-सातपूरकडे जावे.
  • मुंबई नाक्याकडून पंचवटीकडे जाणार्‍या वाहनांनी मुंबई नाका, वडाळानाका, द्वारका, आडगाव नाका, काट्या मारुती, निमाणी असे जावे.
  • सिडको-सातपूरकडून पंचवटीकडे येणार्‍या वाहनांनी मायको सर्कल, जुना सीटीबी सिग्नल, एचडीएफसी सर्कल, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, रामवाडी वा ड्रिम कॅसल मार्गे पंचवटी जावे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!