Blog : एक खरी गोष्ट, लहानपणाच्या शेतकरी आंदोलनाची !

0

शेतीबद्दल प्रत्यक्षात खूप काही माहिती असण्याचे ते वय नव्हतं. अर्थात तरीही शेताशी वेगवेगळ्या कारणाने संबंध यायचाच. कुणाच्या शेतावरुन ऊस तोडून आण; कुणा मित्राबरोबर त्याच्या शेतातून हरभरा आण; कधी कुणा अनोळखी शेताच्या बांधावर असलेल्या बोरीच्या झाडाची, रखवालदाराची नजर चुकवून बोरंच पळव; यासाठी शेताशी भरपूर संबंध यायचा. शाळेतून सुटल्यानंतर कधी कुणाच्या शेतावर तर कधी नदीकाठी अशी भटकंती चालत असे. हे वडिलांचे बदलीचे गांव होते.

आमची स्वत:ची शेती मात्र वडिलांच्या मूळ गांवी होती. बरीचशी कोरडवाहू. केवळ बाजरी वगैरेचे उत्पादन व्हायचे अन्‌ तेही कमी. एकदा चक्क दहा हजार रुपये खर्चून लांबवरुन पाणी आणून कांदा केला. पण सर्व व्यर्थ. त्यावेळी कांद्याचे उत्पन्न अमाप आले अन्‌ भाव गडगडले. दहा पैसे प्रति किलो. अनेकांनी कांदे फेकून दिले. आम्हाला केवळ चार-पाचशेचे उत्पन्न झाले. अर्थात वडील व काकांकडून ही माहिती नंतर केव्हातरी समजलेली.

ज्या छोट्याशा गावांत आम्ही राहात होतो, तेथेही हीच परिस्थिती होती. कांदा फेकून द्यावा लागला होता. मग आम्हा पोरंटोरांनाही शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे याची जाणीव होऊ लागली होती. दरम्यान त्याचवेळेस शेतकरी संघटनेची चळवळ राज्यात जोर पकडत होती. आम्ही रहात असलेलं गांव तर खास शेतकरी संघटनेचंच समजलं जायचं. अधून मधून काही ना काही कार्यक्रम, आंदोलनं, मोर्चे वगैरे प्रकार त्यानिमित्ताने घडायचे. गावातील समग्र भिंतींवर गेरूच्या रंगाने एकच घोषणा ठळकपणे असायची,” शेतमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे.’ आम्ही मुलंही आमच्या गप्पांच्या विषयांत शेतमालाला रास्त भाव मिळण्याविषयी चर्चा वगैरे करत असू. तिसरी चौथीत असू त्यावेळेस.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या खूप जवळच्या तरुण कार्यकर्त्यांपैकी एक कार्यकर्ता त्या गावचा. त्यामुळे शरद जोशींचाही एकदोनदा या गावी कार्यक्रम झालेला. त्या कार्यकर्त्याचे घर आमच्याच गल्लीत होते. तो वडिलांचा विद्यार्थीही असावा. पन्नाशीच्या आसपास वय असलेल्या त्याच्या आईचे आमच्याकडे येणे-जाणे असे. माझ्या आईशी कधी-कधी त्या गप्पा मारायला येत. गप्पांमध्ये शेतकरी संघटनेचा आणि शरद जोशींचा हमखास उल्लेख असे. कधी कधी मी या गप्पा दुरुनच पण बारकाईने ऐकत असे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींची माहिती मिळे व त्या आधारे शाळेतली जी मुले शेतकरी संघटनेवर आणि बाजारभावावर बोलत असत, त्यांच्या समोर बऱ्यापैकी भाव खाता येई.

अशाच पद्‌धतीने काळ पुढे सरकत राहिला. आम्ही शाळा, खेळ यांच्याबरोबरच शेतांमध्ये भटकत राहीलो. शेतातील रानमेवा मुक्तपणे चाखत राहिलो. गप्पा मारत राहिलो. तिकडे शेतकरी संघटनेची आंदोलनंही होत राहिली आणि शेतमालाला रास्त भाव मिळायलाच पाहिजे याच्या घोषणाही होत राहिल्या.

आम्ही सर्व आता सातवीच्या वर्गात होतो. नुकतीच शाळा सुरू झाली होती अन्‌ पाऊसही. एक दिवस सकाळीच शेतकरी संघटनेच्या त्या कार्यकर्त्याच्या आई आमच्याकडे आल्या. संघटनेच्या एका मोर्चासाठी आपल्याला नाशिकला जायचेय म्हणाल्या. गावातील बऱ्याच बायका येणार म्हणाल्या. आई तयार झाली. ते बघून मीही तिच्याबरोबर जाण्याचा हट्ट करू लागलो आणि तिच्याबरोबर येण्याची संमती मिळवली. शाळेला अर्थातच दांडी. आंदोलन-मोर्चा वगैरे गोष्टी समजण्याचे ते वय नव्हतेच. आनंद एवढाच होता की टेम्पोतून जिल्ह्याच्या गावापर्यंत प्रवास करायला मिळणार होता.

त्यानंतर ठरलेल्या वेळी व ठिकाणी एकत्र जमून आमचा टेम्पो नाशिककडे निघाला. त्यात बहुतेक बायकाच होत्या.

साधारण साडेअकरा-बाराच्या सुमारास आम्ही नाशकात पोहोचलो. नाशिकच्या कालिदास कलामंदिरात आमची उतरण्याची व्यवस्था केलेली होती. तिथल्या वेटिंग रुममध्ये आमचे चहापाणी झाले. कुणी डबे वगैरे आणले होते, ते तिथेच खाल्ले. या ठिकाणी जिल्ह्यातून खूपच लोक आलेले होते. सगळीकडे त्यांचीच गर्दी होती. आता कुठे जायचे? काय करायचे? अशा चौकशा करून मी मध्येच आईला सतावत होतो. सर्वांनाच कुठेतरी जायचे होते. झेड.पी., झेड. पी. असे काही बायका व पुरुष म्हणत होते. झेड.पी.वर मोर्चा न्यायचा होता. तिथे भाषणंही होणार होती. त्यानंतर मग आम्हाला परत गावी जायला मिळणार होते.

माझी चुळबुळ सुरुच होती. कुणीतरी मग एक कागद माझ्या हातात दिला आणि म्हणाले की तू भाषण करशील का तेथे? मला बोलायला लावण्याची आयडीया कुणाच्या सुपीक डोक्‍यातून आली कोण जाणे?  आतापर्यंत मी फक्त लोकमान्य टिळक, सानेगुरुजी, डॉ.आंबेडकर, छ. शिवाजी महाराज, या राष्ट्रपुरुषांविषयीच भाषणे केलेली होती. एखाद्या संघटनेबद्दल, मोर्चात भाषण करण्याचा मला काही अनुभव नव्हता. परंतु नंतर एक गोष्ट चांगली झाली की ती जबाबदारी माझ्याकडून निघून गेली.

आता या ठिकाणहून मोर्चाला सुरुवात झाली. शाळेच्या प्रभातफेरीत जातात तशीच बायका-पुरुष-मुले वगैरे दोन-दोनच्या जोड्या करून रांगेने चालायला लागली. मी आईचा हात धरून मोर्चात चालायला लागलो. नाशिक शहराच्या बहुतेक सर्व भागांत फिरून हा मोर्चा झेड.पी.च्या ठिकाणी येणार होता. मोर्चात अधून-मधून घोषणाही दिल्या जात होत्या. पुन्हा शेतमालाला बाजारभाव मिळालाच पाहिजे ही घोषणा होतीच आणि घोषणा देणाऱ्यात मीही होतो. मोर्चा सुरू असतानाच  जोरदार पावसाला सुरवात झाली.

कुणाकडेच छत्री वगैरे काही नव्हते. आमच्याकडेही. पावसाचा जोर तर वाढतच होता. परंतु कुणीही मोर्चाची रांग मोडली नाही की आडोशाला जाऊन थांबले नाही. सर्वजण प्रचंड भिजले होते. तरीही मोर्चा सुरूच होता. मी ओला व्हायला लागलो तसा आईने मला तिच्या पदराखाली घेतले. अर्थात पाऊस लागतच होता. शहरातून हिडणारी सर्व मंडळी आमच्याकडेच कुतुहलाने बघत असल्याचे मला जाणवत होते. शेवटी एकदाचा ठरल्याप्रमाणे झेड.पी. नावाच्या जागेवर मोर्चा आला. तेथील रस्ता या टोकापासून त्या टोकापर्यंत प्रचंड गर्दीने भरुन गेला होता. पोलिसांचा बंदोबस्त होता. पोलीसांच्या गाड्याही बऱ्याच होत्या. आम्ही बसलो होतो त्या शेजारीच कमरेला बंदूक लावलेला एक फौजदार डोळ्याला गॉगल लावून फौजफाट्यासह ऐटीत उभा होता. इकडे मुख्य नेत्यांचे भाषण सुरू झाले.

भाषण काय झाले ते काही समजले नाही. पण मध्येच “शासनाला याची जाणीव असायला हवी….. आमचे शासनाला सांगणे आहे.. ‘ वगैरे वाक्‍य कानावर पडत होते. शासन म्हणजे नक्की कोणती व्यक्ती? असा मला प्रश्न पडला होता. पण त्याचवेळेस जवळ उभा असलेला पोलिस म्हणजेच शासन असला पाहिजे असेही मला वाटून गेले. थोड्या वेळाने काय झाले कुणास ठाऊक पण कुणीतरी घोषणा केली, ” आपल्या मुख्य नेत्यांना नुकतीच अटक करण्यात आलेली आहे. त्याचा निषेध म्हणून आपण सर्वांनीच अटक करून घ्यायची आहे.’ या घोषणेनंतर एकच गोंधळ उडाला. आई आणि मी थोडे घाबरलो, आता काय होणार या विचाराने?

मग कुणीतरी सांगितले की बाजूला ज्या पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत, त्यात आपल्याला जायचेय. बाजूला मिनीबससारख्या निळ्या रंगाच्या व जाळी लावलेल्या पोलिस गाड्या उभ्या होत्या. सर्वानी मग त्यात बसण्यासाठी एकच गोंधळ केला. या गर्दीत कोण कुठे तर कोण कुठे निघून गेले. आमची आणि आमच्या बरोबरीच्या बायकांचीही ताटातूट झाली. आईही गोंधळली आणि घाबरली. तिनं माझा हात घट्ट धरुन ठेवला. पण तिला ओढतच मी त्यातल्या एका गाडीपाशी घेऊन गेलो. आणि तेथे जमलेल्या बायका आणि पोलीस यांच्या गर्दीतून वाटत काढत बसमध्ये चढलोही.

पोलिस बसमध्ये चढल्यावर सर्वात आधी एक गोष्ट केली. माझ्यासाठी खिडकीजवळची जागा बघितली आणि शेजारचे सीट आईसाठी पकडून ठेवले. मग तिथून खाली गर्दीत असलेल्या आईला ओरडून सांगितले, “तुझी पण जागा धरलीये, पटकन आत ये’. मग बऱ्याच वेळाने गर्दीतून वाट काढत आई आली आणि मी पकडलेल्या जागेवर बसली. त्यावेळेस एवढ्या गर्दीतून दोन जागा पकडल्याचे पूरेपूर समाधान आणि अभिमान माझ्या मनात दाटून आला होता. आपण जागा पकडली ती गाडी पोलिसांची आहे आणि हा अटक होण्याचा प्रकार आहे, ही गोष्ट तर मी साफच विसरून गेलो होतो. 

यथावकाश आम्ही गंगापूर रोडवरील पोलिसकॅंपवर- जिथे पूर्वी पोलिसांच्या पत्र्याच्या बराकी होत्या –तिथे आलो. त्याठिकाणी आमची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. आम्हाला त्यांच्यातर्फे चहाही देण्यात आला. दोन-तीन तास थांबल्यानंतर सायंकाळच्या सुमारास आम्ही परत आमच्या टेंम्पोत बसलो आणि गावाकडे निघालो. टेम्पो निघताना पुन्हा घोषणा वगैरे झाल्या, शेतमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे. आमची गाडी गावच्या वाटेला लागली. रात्र होत होती. आकाशात चंद्र उगवला होता. हवेत गारवा होता. त्या रम्य वातावरणात मीही मग आईच्या मांडीवर हळूच डोके ठेवून शांतपणे झोपून गेलो. अभावितपणे, लहानपणीच एका आंदोलनात सामिल झालेल्या मला मात्र त्यावेळेस ही कल्पना नव्हती की मोठं झाल्यावर आपल्याला रोजच्या जीवनात अनेक आंदोलनांना सामोरं जावं लागणार आहे. पत्रकार म्हणून समाजहितासाठी अनेक गैर गोष्टींविरोधात पदोपदी आंदोलन करावं लागणार आहे. तत्वांसाठी लढावं लागणार आहे.

आज या घटनेला जवळपास २७ वर्षे होऊन गेलेली आहेत. त्या आंदोलनात सहभागी झालेले अनेक नेते पक्ष बदलत मोठे झालेले आहेत. तर कुणी या जगाचा निरोपही घेतला आहे. शेतमालाला रास्त भाव मिळायलाय पाहिजे असे म्हणणारे माझे शाळासोबती, कुणी नोकरी- व्यवसायात, तर कुणी शेतीत स्थिरावले आहेत. शेतकरी संघटनेचे विविध गटात तिचे विभाजन झाले आहे. आजही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या संघटनांचे आंदोलनही जोमात सुरू असते.

एकूण माझ्यासह सर्वांचेच सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. प्रत्यक्षात साकारली नाही एक गोष्ट, ती म्हणजे ‘शेतमालाला रास्त भाव मिळण्याची’.

  • पंकज जोशी (digi.edit1@deshdoot.com)

LEAVE A REPLY

*