नाशिकच्या अक्षताने दहावीला मिळविले ९९.८० टक्के गुण

0

नाशिक, दि.13, प्रतिनिधी  :

दहावीच्या परिक्षेत तब्बल 99.80 टक्के गुण मिळविणारया अक्षता रविंद्र पाटील या विद्यार्थीनीला एमबीबीएस केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा पास होण्याची इच्छा आहे.

दरम्यान अक्षताची जुळी बहीण असलेली ऋतुजा देवेंद्र पाटील हिला देखील दहावीच्या परिक्षेत 93.20 टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे पाटील परिवारात निकालानंतर जल्लोष करण्यात आला.

दहावीच्या परिक्षेसाठी तिने रोज तब्बल सहा तासांहून अधिक वेळ अभ्यास केला आहे.

नाशिकच्या गंगापूर रोडवरील रचना विद्यालयात शिकणारया अक्षताचे वडील रविंद्र व आई स्वाती हे दोन्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत.

कोणत्याही गाईडचा आधार न घेता अक्षताने रोज शालेय पाठयपुस्तकातून अभ्यास केला. त्यानंतर तिने या पुस्तकांमधून स्वत:च्या नोटस काढत दररोज सहा तास असे अभ्यासात सातत्य ठेवले.

अभ्यासातील नियमितता, एकाग्रता कायम ठेवत तिने दहावीच्या परिक्षेत तब्बल 99.80 टक्के गुण मिळवले आहेत.

त्यात मराठीत 100 पैकी 86, संस्कृतमध्ये 100 पैकी 99, इंग्रजीत 93, गणितात 96, विज्ञान तंत्रज्ञान विषयात 97 आणि सामाजिक शास्त्रात तब्बल 99 गुण तिने मिळवले आहे.

तिला एकूण 500 गुणांपैकी 484 अधिक खेळाचे व इतर 15 असे एकूण 499 गुण मिळाले आहेत. केवळ एक गुणाने 100 टक्के निकालाला हुलकावणी दिली आहे.

आता पुढे अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेत त्यानंतर एमबीबीएस पूर्ण करण्याची तिची ईच्छा आहे. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला ती लागणार आहे.

केवळ घरातूनच नव्हे तर शाळेतूनही तिला चांगले पाठबळ मिळाले आहे. शाळेतील शिक्षकांनीही उत्तम शिकविल्याचे अक्षताने सांगितले.

 

LEAVE A REPLY

*