Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पुन्हा खंजिराचे राजकारण

Share

नाशिक | प्रकाश कुलकर्णी

1978 साली महाराष्ट्राच्या राजकारणात खंजीराचे राजकारण सर्वप्रथम चर्चेत आले. त्यानंतरच्या 42 वर्षांत सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या मगदुराप्रमाणे या खंजीराचा वापर करून राजकीय उद्दिष्टे साजरी केली आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी काही वेगळे केले आणि सत्तेत प्रवेश केला असे समजण्याचे कारण नाही.

1978 साली त्यांचे काका शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता बळकावली होती. पुतण्याने काकांची विद्या काकाला परत केली आहे एवढाच महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींचा अर्थ आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या विचारसरणीला आणि तत्त्वांना मूठमाती दिल्याचे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. शिवसेनेने आजपर्यंत कधीही सत्तेच्या पाठीमागे लागणे हे आपले ध्येय होते, असे म्हटलेले नाही. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची भूमिका पाहता पाहता बदलली आणि शंभर टक्के राजकारणासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची क्षमता पाहून महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांना हसावे की रडावे, हेही समजेनासे झाले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा संधी असूनही सत्तेचा उपभोग कधी घेतला नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही सत्तापदापेक्षा ङ्गमातोश्रीफमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा रिमोट कंट्रोल अधिक शक्तिशाली होता. कारण हा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात असतो याच्यावर त्याची ताकद अवलंबून असते.

गेल्या महिन्याभराच्या राजकीय धुमाळीनंतर सर्व साधनसूचितेला तिलांजली देऊन महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन झाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेचा कौल दिला होता. शिवसेनेने प्रथमपासूनच अडीच अडीच वर्षांचे तुणतुणे लावून धरले. त्याचा राजकीय फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने घेतला नसता तर नवल होते. तथापि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी जन्माला येण्याआधीच मृत पावली आहे. त्याबद्दल अश्रू ढाळण्याचे कारण नाही. कारण तो संधिसाधूंचाच खेळ होता.

यानिमित्ताने सर्वसामान्य माणसाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. राजकीय पक्ष नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणे यापुढे अवघड जाणार आहे. नेते बोलतात तसे वागत नाहीत आणि जसे वागतात तसे सांगत नाहीत. आजवर महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेबद्दल लोकांच्या मनात शंका होती. अलीकडेच संजय राऊत म्हणाले होते, शरद पवार यांना समजून घ्यायला शंभर जन्म लागतील.

पण त्याहीपेक्षा काही दिवसांपूर्वीच निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर सुप्रिया सुळे त्यांच्या वडिलांबद्दल जे म्हणाल्या होत्या तेच खरे असावे. त्या म्हणाल्या, निवडणुका आल्या की बाबांच्या (शरद पवारांच्या) अंगात एक वारे संचारते आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते अक्षरश: दौडू लागतात.

गेल्या दोन-अडीच महिन्यांत पवारांनी केलेले राजकारण सुप्रिया सुळे जे म्हणाल्या होत्या ते बरोबर असल्याचे दाखवतात. आता महाराष्ट्रात एक राजकीय भूकंप झाला आहे. देेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असल्याचे उघड आहे.

शरद पवार यांनी भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असे जरी जाहीर केले असले तरी त्यांनी पडद्याआडून पुतण्याला आशीर्वाद दिलाच नसेल, असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. शरद पवार गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्या वेळेपासूनच त्यांच्या राजकीय डावपेचांबद्दल निरीक्षकांच्या मनात शंका-कुशंका डोकावत होत्या. महाराष्ट्रात फडणवीस सरकार पुन्हा स्थापन झाल्याने त्या शंका-कुशंका नसाव्यात तर वस्तुनिष्ठ निरीक्षण असावे, असे मानता येईल.
यानिमित्ताने राजकीय पक्षांच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!