Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : महापुरानंतरचे ‘अश्रू’ : चांदोरीच्या कोळीवाड्यात होत्याचे नव्हते…

Share

नाशिक। कुंदन राजपुत/दिनेश सोनवणे

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले…’

गोदामाईच्या काठी वसलेल्या चांदोरी व सायखेडा गावातील महापुराने बाधित रहिवाशांची अवस्था पाहिल्यावर कवीवर्य कुसुमाग्रज यांची ही कविता आठवते. महापुराचे पाणी गावात शिरल्याने येथील शेकडो गोरगरिबांचे संसार वाहून गेले. भिंत खचली, चूल विझली अशी अवस्था असून महापुराने त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले.

मात्र, तरीदेखील परिस्थितीसमोर हार न मानता जिद्दीने संसाराचा डाव मांडण्याचा त्यांचा संघर्ष सुरू आहे. मोडून पडलेल्या संंसाराला संघर्षाची किनार आहे. मायबाप सरकारने निदान मदतीचा आधार द्यावा, अशी भाबडी अपेक्षा पूरग्रस्त बाधितांनी व्यक्त केली आहे.

गोदेला आलेला महापूर ओसरल्यानंतर चांदोरी व सायखेडा या दोन्ही गावात पुराने मागे सोडलेले निशाण हृदय पिळवटून टाकणारे आहे. तब्बल तीन दिवस ही दोन्ही गावे पाण्याखाली होती. गोदेच्या रौद्ररुपात अनेकांचा घरासह संसार वाहून गेला. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याने अनेक परिवार उघड्यावर आले. पुरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यास शासकीय यंत्रणा अपुरी ठरत आहे. ‘साहेब’ लोक न फिरकल्याने पूरबाधित संताप व्यक्त करत आहेत.

नाशिकपासून 17 किलोमीटरवर असलेल्या चांदोरी गावाच्या हद्दीत प्रवेश केल्यावर आजूबाजूला महापुराने घातलेला धूमाकुळाचे चित्र पहायला मिळते. शेतातील पिके आडवी झाली. द्राक्षांचे मळे झोपले. अनेक शेतात तर पाण्याचे तळे साचले आहे. गावाच्या वेशीवर दुर्गा मंदिर कोळीवाड्याची वस्ती. गोरगरिबांचे 50-60 परिवार. पुराचे पाणी पहिले याचा गावात शिरले. येथील लोकांची धाब्याची घरे तीन दिवस पाण्यात होती.

ज्येष्ठ नागरिक, पोरं बाळं, बाळंतीण यांना जीव वाचविण्यासाठी गावातील मंदिर, दुसर्‍या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीचा सहारा घ्यावा लागला. ग्रामपंचायतीच्या लोकांनी भोंगा वाजवून धोक्याचा इशारा देण्याचे कर्तव्य इमाने इतबारे पार पाडले. मात्र, पुढची जबाबदारी ही सामाजिक व सेवाभावी संस्था व गावकर्‍यांनी ऐकीचे दर्शन घडवत पार पाडली.

पूरबाधिताना खिचडी, बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या त्यांनी पोहोचवल्या. दोन दिवसांनी लोक जेव्हा घरी आले तेव्हा होत्याचे नव्हते झाले होते. घरांचा भिंती खचल्याने पडल्या होत्या. काहीची तर घरेच वाहून गेली. आता फक्त आठवणी उरल्या आहेत.

निदान घरकुल तरी द्यावे

दरवर्षी पुरात हीच अवस्था असते. जीव वाचविण्यासाठी पोर नातवंडांना घेऊन मंदिरात पळावे लागले. तेथे बिस्किटे खाऊन दिवस काढले. तीन दिवस घरात पाणी होते. पुरात अनेक साहित्य वाहून गेले. घरांची भिंत पडली. पाहणी करायला कोणी फिरकटले पण नाही. शासनाने घरकुलाचा लाभ द्यावा.

ताराबाई पवार


माहेरच्यांनी शिधा दिला

पुराचे पाणी अचानक वस्तीत शिरले. पोरंसोरं घेऊन पाण्याच्या टाकीवर गेलो होतो. घराच्या भिंती खचल्या, घरातील रेशनही वाहून गेले. माहेरच्या मंडळींनी शिधा आणला तेव्हा कोठे चूल पेटली. अस्वच्छतेमुळे ताप, सर्दी, अंग दुखणे, चिखल्या हे आजाराने लहान पोरापासून मोठे आजारी आहे.

सुवर्णा गायकवाड


बाळाला घेऊन टाकीवर चढले

दोन महिन्यांचे बाळ घेऊन कंबरे इतक्या पाण्यातून दुसर्‍या मजल्यावरील पाण्याची टाकी चढावी लागली. त्या ठिकाणी 50 ते 60 लोक होते. सात-आठ दिवसांपासून जेवणाचे वांदे आहे. लहान पोर तापाने फणफणले आहे. कोणी अधिकारी चौकशीसाठी किंवा मदतीसाठी आलेदेखील नाही.

सारीका गायकवाड


बिस्कीट खाऊन दिवस काढले

दुर्गा मंदिर कोळीवाड्याला चहूबाजूने पाण्याचा वेढा होता. पाण्याच्या टाकी येथील रुमवर दोन दिवस मुक्काम होता. खाली पाणी भरल्याने येथे जेवण पुरवणे अवघड होते. बिस्किटे खाऊन दोन दिवस काढले. वस्तीत अजूनही गाळ पडला असून स्वच्छतेसाठी कोणी आले नाही. साथीचे रोग पसरले आहे. निदान औषध फवारणी तरी येथे करावी.

मनीषा गायकवाड


जगण्यापेक्षा मरण परवडले

घरातील पाणी उपसून उपसून थकलो. रात्री देवीच्या मंदिरात मुक्काम ठोकतो. तीन दिवस खायचे प्यायचे हाल झाले. घराला ओल असल्याने पलंगावर गॅस व जेवणाचे साहित्य ठेवून स्वयंपाक करत आहोत. शासनाकडून कोणतीही मदत नाही. दरवेळेस लेकर बाळं कोठे घेऊन पळायचे.

इंदूबाई कडाळे


फक्त पाणी बाटल्या मिळाल्या

रहायची सोय नसल्याने बचावासाठी समोरच्या माडीवर मुक्काम ठोकावा लागला. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होते. दोन दिवस जेवणाची गैरसोय झाली. खाण्याच्या वस्तू आमच्यापर्यंत आल्याच नाही. फक्त पाण्याच्या बाटल्या पोहोचल्या.

लता खैरनार


अनेकांचे प्राण वाचवले

संपूर्ण गावात पाणी शिरले होते. एनडीआरफची टीम उशीरा दाखल झाली. गावातील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन टीमने जवळपास 60 ते 70 जणाचे प्राण वाचवत स्थलांतर केले.

सोमनाथ कोथमे,
आपत्ती व्यवस्थापन सदस्य


स्वच्छता मोहीम राबवली

अग्शिमनच्या गाड्यांनी साफसफाई केली. टँकरचे पाणी शुद्ध करून लोकांना दिले जात आहे. गावात डस्टिंग चालू आहे. शेती, दुकानांचे पंचनामे सुरू आहे. आरोग्य शिबिरदेखील राबविण्यात आले असून गोळ्यांचे वाटप केले जात आहे.

संजय मते,
ग्रामविकास अधिकारी, चांदोरी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!