स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बागलाण तालुक्यातील ‘या’ गावात आली ‘लालपरी’; आमदार स्वतः एसटीतून आल्याने पंचक्रोशीत चर्चा

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बागलाण तालुक्यातील ‘या’ गावात आली ‘लालपरी’; आमदार स्वतः एसटीतून आल्याने पंचक्रोशीत चर्चा

सटाणा | शशिकांत कापडणीस

देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही एसटी बस सेवेचा लाभ न मिळालेल्या बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम पश्चिम पट्ट्यातील करंजखेड गावात एसटी बसचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.

उल्लेखनीय बाब म्हणजे आमदार बोरसे यांनी सटाणा आगाराच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत स्वतः बसने प्रवास केला.अनेक वर्षांपासून पंधरा किलोमीटर पायपीट करून डांगसौंदाणे येथे शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार बोरसे यांनी स्वतः बसने प्रवास करत करंजखेड गाठले व परिसरातील 80 हून अधिक विद्यार्थ्यांना बस मध्ये बसवून थेट डांगसौंदाणे येथील विद्यालयात सोडल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार बोरसे यांच्या कार्याचे स्वागत केले आहे.

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील करंजखेड परिसरातील दीडशेहून अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी दररोज पंधरा किलोमीटर पायपीट करून डांगसौंदाणे येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये जात असल्याने या परिसरात बस सेवा सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे केली होती.

आमदार बोरसे यांनी पंधरा दिवसांपूर्वी सटाणा बस आगाराचे आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांची भेट घेत करंजखेड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या.आगार व्यवस्थापक बिरारी यांनी 20 जानेवारीपासून बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

त्याचवेळी आमदार बोरसे यांनी 20 जानेवारी रोजी आपण दोघे बसमध्ये करंजखेड येथे जाऊ असे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे आज सकाळी आठ वाजताच आमदार दिलीप बोरसे सटाणा बस आगारात दाखल झाले. आगार व्यवस्थापक बिरारी यांनी ठरल्याप्रमाणे सटाणा करंजखेड बसचे  नियोजन केल्याने सकाळी साडेनऊ वाजता आमदार दिलीप बोरसे व आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांच्यासह बस करंजखेडच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली.

करंजखेड येथे इतिहासात पहिल्यांदाच बस दाखल झाल्याने  करंजखेडवासियांनी आमदार बोरसे यांच्यासह आगार व्यवस्थापक बिरारी व चालक वाहकाचे जंगी स्वागत केले.विशेष म्हणजे स्थानिक आदिवासी बांधवांनी मान्यवरांचे स्वागत करण्यासोबतच एसटी बस देखील सजवून टाकली.

गोरगरिबांची सेवा यातच खरे समाधान

गोरगरीब आदिवासी बांधवांच्या अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असल्यातरी आजच्या आधुनिक युगात प्रवासाची साधने देखील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एकविसाव्या शतकातही विद्यार्थ्यांना 15 किलोमीटर पायी प्रवास करून शिक्षणासाठी जावे लागत असेल तर ते नक्कीच दुर्दैव  असून अशा गंभीर समस्या सोडवणे हे मी माझं कर्तव्य समजतो.

  • दिलीप बोरसे, आमदार, बागलाण विधानसभा

प्रवाशांच्या सोईसाठी सदैव कटिबद्ध

राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असून आमदार दिलीप बोरसे यांच्या पाठपुराव्यामुळेच सटाणा-करंजखेड बस सुरू झाली.माझ्या कार्यकाळात ही सेवा सुरू झाल्याचा आनंद कायम स्मरणात राहील.

  • उमेश बिरारी,आगारप्रमुख सटाणा बस स्थानक

आम्ही दररोज पंधरा किलोमीटर पायी प्रवास करून शाळेत जायचो मात्र आज पहिल्यांदा आम्हाला बसवर प्रवास शाळेत जाण्याचे भाग्य लाभले आहे. आमदार दिलीप बोरसे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून  त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.

योगिता देशमुख, विद्यार्थिनी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com