Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अबब! घोटीत पकडलेल्या पावणेनऊ लाखांत ८३ हजारांची चिल्लर

Share
घोटी : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक जोर धरीत असतांना निवडणूक विभागाच्या स्थायी निगराणी पथकाने घोटी टोल नाक्यावर संशयास्पद वाहनातून 8 लाख 83 हजारांची रोख रक्कम जप्त केली. विशेष म्हणजे यामध्ये 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची एकूण रक्कम 83 हजार आहे. भरारी पथक प्रमुख अरविंद पगारे यांच्या नेतृत्वाखालील स्थायी निगराणी पथकाने चिल्लर आणि रोख रक्कम इगतपुरी येथील उपकोषागार कार्यालयात सीलबंद करून जमा केली आहे.
अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीचा ज्वर आता वाढत चालला आहे. अवैध पैसे आणि मद्याचा पूर वाढत असल्याच्या घटनांवर लक्ष दिले जात आहे. यानुसार निवडणूक यंत्रणेचे स्थायी निगराणी पथक अरविंद पगारे यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथील टोल नाक्यावर सक्रिय आहे.
पथकप्रमुख अरविंद पगारे यांच्या सूक्ष्म नजरेतून मुंबईकडून नाशिककडे जाणारे वाहन क्रमांक MH 05 CM 8620 ह्याची त्यांनी तपासणी केली. यात 500 रुपयांच्या 1600 नोटा अशी 8 लाखाची रक्कम, 5 आणि 10 रुपयांची 83 हजारांची नाणी अशी एकूण 8 लाख 83 हजारांची रोख रक्कम आढळून आली.
वाहनचालक अनिलकुमार शिंदे, मालक सुनील हजारी यांना ह्या रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. ह्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली.
स्थायी निगराणी पथकप्रमुख अरविंद पगारे यांच्या नेतृत्वाखाली शिवचरण कोकाटे, पोलीस कर्मचारी पुंडलिक बागुल, विलास धारणकर, कॅमेरामन अमित बोधक यांनी ही धडक कारवाई केली. जप्त केलेल्या रक्कमेत 83 हजारांची नाणी असल्याने मोजदाद करतांना सर्वांची दमछाक झाली.
संपूर्ण रक्कम इगतपुरी येथील उपकोषागार अधिकारी अण्णासाहेब भडांगे यांच्या ताब्यात देण्यात आली. पंचनामा आणि सर्व सोपस्कार करून रक्कम पेटीत सीलबंद करून सुरक्षित ठेवण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे निवडणूक यंत्रणेने सूक्ष्म लक्ष वाढवलेले आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!