बोंडअळी नुकसानग्रस्त 38 हजार शेतकरी मदतीपासून वंचित

0

नाशिक । दि. 12 प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्राप्त 7 कोटी 2 लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. मात्र, नुकसानग्रस्त 53 हजार शेतकर्‍यांपैकी 15 हजार 330 शेतकर्‍यांना मदत देण्यात आली.

अद्यापही सुमारे 38 हजार शेतकरी मदतीपासून वंचित असून, याकरिता 16 कोटी 46 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मालेगाव, नांदगाव, येवला, देवळा, चांदवड, निफाड, सिन्नर या 7 तालुक्यांत 35 हजार 947 हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे बोंडअळी आणि तुडतुडी रोगाच्या प्रादुर्भावाने मोठे नुकसान झाले.

याचा फटका 53 हजार 393 शेतकर्‍यांना बसला. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने मालेगाव आणि येवला तालुक्यात नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. या दोन तालुक्यात एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी 27 हजार 713 हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यात जिरायत क्षेत्राचे 24 हजार 924 हेक्टर तर 2789 हेक्टर बागायती क्षेत्र बाधित झाले.

शासनाने जिरायत क्षेत्रासाठी 6800रु. तर बागायत क्षेत्रासाठी 13 हजार 500रुपये हेक्टरप्रमाणे मदतीचे निकष जाहीर केले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी 23 कोटी 66 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली. त्यातील प्राप्त 7 कोटी 2 लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले.

7 पैकी 5 तालुक्यांतील 15 हजार 393 शेतकर्‍यांना पूर्णपणे मदतीचे वाटप करण्यात आले. मात्र सर्वाधिक नुकसान झालेल्या मालेगाव आणि येवला तालुक्यातील शेतकरी मात्र अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. या तालुक्यातील काही शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात मदत देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही सुमारे 38 हजार 63 शेतकर्‍यांना मदत देणे बाकी आहे. याकरिता 16 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

मालेगावला सर्वाधिक नुकसान
येवला तालुक्यात 15 हजार 45 हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. त्यापैकी 13 हजार 748 हे. क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले. या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी 9 कोटी 33 लाख 87 रुपये मंजूर करण्यात आले, तर मालेगाव तालुक्यात 18 हजार 835 हे. क्षेत्रापैकी 13 हजार 965 हे. क्षेत्र बाधित झाले. यात जिरायती आणि बागायती क्षेत्राचा समावेश आहे. या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी 11 कोटी 36 लाख 15 हजार 840 रुपये मदत शासनाने जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

*