Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिकमधील ३२ विद्यार्थी राजस्थानच्या कोटा येथून सुखरूप परतले; नातलगांना अश्रू अनावर

नाशिकमधील ३२ विद्यार्थी राजस्थानच्या कोटा येथून सुखरूप परतले; नातलगांना अश्रू अनावर

नाशिक | प्रतिनिधी 

राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी कोटामध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकांनी शासनास विनंती केली होती. लॉकडाऊनच्या काळात देशभरात संचारबंदी लागू असल्याने तसेच राज्यातही जिल्हाबंदी असल्याने कोणालाही पूर्वपरवानगीशिवाय परजिल्ह्यात जाता येत नव्हते. मात्र राज्य शासनाच्या प्रयत्नांनी  या विद्यार्थ्यांना आज घरी सुखरूप आणण्यात आले.

- Advertisement -

शहरातील द्वारका येथे विद्यार्थ्यांची भेट होताच नातलगांचे अश्रू अनावर झालेले बघायला मिळाले. नाशिक जिल्ह्यातील एकूण ३२ विद्यार्थी कोटा येथे शिक्षण साठी गेले होते.

या विद्यार्थ्यांना घेऊन कोटा येथून गुरुवारी (दि ३०) दुपारी ३ वाजता या बसेस निघाल्या होत्या. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्यांची चांदवड येथे तपसणी करण्यात आली. यानंतर पाच वाजेच्या सुमारास या बसेस द्वारका वर आल्या. यावेळी पोलीस अधिकारी आणि वाहतूक निरीक्षक नरेश पाटील यांची याठिकाणी उपस्थिती होती.

यावेळी भद्रकाली पोलिस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे हे देखील उपस्थित होते.

राज्यात शिक्षणाचा जसा ‘लातूर पॅटर्न’ तयार झाला होता. तसाच राजस्थानमधील कोटा पॅटर्न शैक्षणिक क्षेत्रात प्रसिध्द आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षांची तयारी तेथे करून घेतली जाते. या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कोटा (राजस्थान) येथे जातात. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दळण-वळणाची साधने बंद झाली होती.

अशा परिस्थितीत परराज्यातून राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांनी केंद्र शासन व राजस्थान सरकारशी चर्चा करुन कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यशस्वी बोलणी करुन आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून 70 बसेस रवाना केल्या होत्या.

कोटामधील (राजस्थान) विद्यार्थ्यांना लवकरात लवकर माघारी आणण्याची विद्यार्थ्याच्या पालकांची मागणी लक्षात राज्य शासनाने राज्याच्या उत्तर सीमेवरील व कोटाजवळचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्यातून बसेस सोडण्याचे नियोजन केले. यासाठी राज्याचे महसुल राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी परिवहनमंत्री यांचेशी चर्चा करुन धुळे जिल्ह्यातील 70 बसेस उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली. व आज त्याची अंमलबजावणी झाली. त्यानुसार आज धुळे येथून 70 बसेस कोटाकडे रवाना केल्या होत्या.

धुळे ते कोटा हे 630 किलोमीटरचे अंतर होते. त्यामुळे प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती करण्यात आली होती. या चालकांना स्वसंरक्षणासाठी परिवहन महामंडळाने आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले होते. त्यात मास्क, सॅनिटायझरचा समावेश करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या