Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : विधानसभा निवडणूकीसाठी सातव्या दिवशी ३१ उमेदवारी अर्ज दाखल

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातून आज विधानसभा निवडणुकीसाठी ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज ऐनवेळी अनेक उमेदवारांची नावे पक्षाच्या यादीत जाहीर झाल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धावाधाव बघायला मिळाली.

आज नांदगांव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांनी तर सुहास कांदे यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला. मालेगाव मध्यमध्ये शेख असिफ शेख रशीद यांनी काँग्रेसकडून तर मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिफ यांनी एमआयएमकडून अर्ज दाखल केला तर शेख इब्राहिम शेख असलम यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला.

बागलाण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार दीपिका चव्हाण यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला तर पोपट अहिरे, गणेश आहिरे, रेखा पवार, यशवंत पवार यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर भाजपचे माजी आमदार  दिलीप बोरसे यांनाही भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांनीही उमेदवारी अर्ज आज भरला.

तर अंजनाबाई मोरे यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. तर कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघात नितीन पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तर जिवा पांडूरंग गावित यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियातर्फे अर्ज दाखल केला.

तिकडे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून तर आमदार डॉ. राहूल आहेर यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला. येवल्यात संभाजी पवार यांनी शिवसेना, नरसिंह दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अर्ज दाखल केला.

सिन्नरमध्ये  माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस, निफाडमधून दिलीप बनकर यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.  दिंडोरीतून धनराज महाले यांनी शिवसेना, तर राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ, तर अरुण गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.

नाशिक (मध्य) देवयानी फरांदे यांनी भाजप तर दीपक डोके यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक (पश्चिम)मधून  सिमा हिरे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

देवळाली विधानसभा मतदार संघातून योगेश घोलप यांनी शिवसेनेकडून तर अॅड. अमोल पठाडे यांनी बहुजन समाज पार्टी तसेच गौतम वाघ यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.

इगतपुरीमधून कॉंग्रेसचे हिरामण खोसकर यांनी तर शिवसेनेकडून निर्मला गावित यांनी उमेदवार अर्ज दाखल केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!