गंगापूरमधून २०२४ क्युसेस पाण्याचा विसर्ग; अद्यापही अनेक लहान मंदिरे पाण्याखाली

0

नाशिक | गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरुच असल्यामुळे धरणसाठा ९१ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. आज प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२४ क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून करण्यात आलेल्या विसर्गामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी वाढणार आहे.

गंगापूर धरणसमूहात गंगापूर धरण मोठे तर गौतमी, आळंदी आणि कश्यपी हे तिन्ही धरणे मध्यम आहेत. आजच्या घडीला गंगापूर धरण ९१ टक्के, कश्यपी ९९, गौतमी ९४ आणि आळंदी १०० टक्के भरले आहेत.

जर त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार सुरूच राहिली तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहत्या पाण्यात उतरू नये, सेल्फी काढण्याच्या मोहात पडू नये. एखाद्या पुलावरून पाणी जात असेल तर पुलावर जाऊ नका, आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

श्रावण मासानिमित्त गंगेवरील मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक नाशिककरांनी गोदावरी नदीकाठी गर्दी केली आहे.

शहरातील नवश्या गणपती, सोमेश्वर आणि सोमेश्वर धबधबा परिसरात सेल्फीसाठी जणू झुंबडचा उडालेली दिसून आली. गंगापूर धरणातून कुठल्याही क्षणी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचा इशारा दिला असतानाही पाण्याच्या अगदी जवळ जाऊन कुठलीही भीती न बाळगता सेल्फी बहाद्दर मात्र फोटो काढताना दिसून आले.

सर्व फोटो : सतीश देवगिरे, देशदूत डिजिटल नाशिक

LEAVE A REPLY

*