Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

बारावी बोर्डाचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ; १५ नोव्हेंबरपर्यंत दाखल करता येणार अर्ज

Share

पुणे | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱया इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांमधील नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ‘सरल डेटाबेस’वरुन नियमित शुल्कासह भरण्यासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज एचएससी व्होकेशनल स्ट्रीमवरुन भरावयाचे आहेत.

सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेत प्रविष्ठ होणारे विद्यार्थी यांनाही ऑनलाईन अर्ज भरावे लागणार असून यांना दि. ३१  ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. अर्ज भरताना काही अडचणीचे येत असल्याचे महाविद्यालयांकडून राज्य मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

याची दखल घेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आलेला आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करुन बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी आता दि.१ ते २६  नोव्हेंबर या कालावधीत मुदत देण्यात आलेली आहे. शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळाकडे दि. २८ नोव्हेंबर रोजी जमा करावयाच्या आहेत, अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!