मुंबईहून नाशिकमध्ये आलेले १०० परप्रांतीय ताब्यात; आनंदवली भागातील शेल्टरमध्ये रवानगी

मुंबईहून नाशिकमध्ये आलेले १०० परप्रांतीय ताब्यात; आनंदवली भागातील शेल्टरमध्ये रवानगी

नाशिक । प्रतिनिधी

दिडशे ते दोनशे किलोमीटर अंतर पायी चालून मुंबईतून  घराकडे निघालेल्या शेकडो परप्रांतीय नागरिकांना शहर पोलिसांनी पकडले. आज सायंकाळच्या सुमारास मुंबई नाका पोलिसांनी  ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व नागरिकांची आनंदवली भागातील शेल्टरहोममध्ये रवानगी करण्यात आली आहे.

लॉकडाउनचा सर्वाधिक फटका मोठ्या शहरांना बसला असून, असंख्य नागरिक मुंबई, ठाणे यासह इतर शहरांमध्ये अडकून पडले आहे. यात मोलमजुरी, ठेकेदारी पद्धतीने काम करणारे कामगार आदींचा समावेश आहे.

लॉकडाउनमुळे रोजदांरी बुडाली अन घराकडे परतण्याचा मार्गही बंद आहे. यामुळे मजल दरमजल करीत शेकडो नागरिक आपल्या मूळ गावी परतण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

मुंबई नाका भागातील उड्डाण पुलावर यातील सुमारे शंभर नागरिकांना पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले. अचानक उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने तिथे धाव घेतली.

महिला, पुरूष आणि मुले त्यांना दिसून आली. या सर्वांना सोशल डिस्टेन्सींगचे पालन करीत उड्डाण पुलावर थांबविण्यात आले.  या नागरिकांकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली.

त्यात या नागरिकांनी आपले मूळ गाव उत्तर भारतात असल्याचे सांगितले. दरम्यान, यात काही महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार या नागरिकांचा प्रवास पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी या सर्व नागरिकांची रवानगी गंगापूररोडवरील आनंदवली भागातील महापालिकेच्या शेल्टर होममध्ये केली आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जेवणाची सुविधा प्रशासन करणार आहे.

नाशिकमध्ये आतापर्यंत आठशेपेक्षा अधिक पायी व वाहनातून अनाधिकृत प्रवास करणाऱ्या नागरिकांना पकडण्यात आले आहे. या नागरिकांना वेगवेगळ्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले आहे. त्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात ठेवण्यात आलेल्या नागरिकांपैकी एक करोनाग्रस्त आढळून आला आहे. दररोज शेकडो नागरिक मजल दरमजल अंतर आपला जीव धोक्यात घालून कापत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com