राष्ट्रवादीचा १० सप्टेंबर रोजी नाशिक महापालिकेवर महामोर्चा

0

नाशिक : नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात आलेली करवाढ सरसकट रद्द करावी यासह नाशिककरांच्या विविध प्रश्नांवर सोमवार दि.१० सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दुपारी १ वाजता राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथून नाशिक महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिक महानगरपालिकेतील अन्यायकारक करवाढ सरसकट रद्द करावी तसेच नाशिककरांच्या विविध प्रश्नांबाबत शासनस्तरावर हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळासोबत नाशिकच्या विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन करवाढ सरसकट रद्द न केल्यास नाशिक महापालिकेवर तीव्र स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानुसार नाशिक महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

नाशिक शहराचा विकास करत असतांना शहरातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करण्याची आवश्यकता आहे. नाशिक महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी महासभेमध्ये नाशिककरांच्या भावना लक्षात घेऊन करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला असतांना प्रशासनाने मात्र नाशिककरांना करवाढीच्या खायीमध्ये लोटण्याचे काम केले.  नवीन मिळकतीसह सर्व प्रकारच्या मोकळ्या भूखंडांचे करयोगमुल्य वाढवल्यामुळे शाळा, महाविद्यालये, क्रीडांगणे, रुग्णालये, सिनेमागृहे, शेतजमीन, तसेच उद्योगांचे कंबरडे मोडणार आहे.

नाशिक महानगरपालिकेने केलेली अवास्तव करवाढ ही निश्चितच असमर्थनीय आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने दिलेल्या आंदोलनाच्या इशा-यानंतर दिनांक ३० ऑगस्ट रोजी मनपा प्रशासनाने निवासी मालमत्तांच्या करयोग्यमूल्य  दरात सरासरी ५० % तर अनिवासी व व्यावसायिक मालमत्तांच्या करयोग्यमूल्यात २५% कपात करण्याचे  जाहीर केले आहे. केवळ मलमपट्टी करण्याकरीता थोडीफार करवाढ कमी करून नाशिककरांची दिशाभूल करण्यात आलेली आहे. वस्तुतः जर आधीच संपूर्ण करवाढ रद्द केली असती तर शहरात एवढा मोठा गोंधळ व जनक्षोभ निर्माण झाला नसता. त्यामुळे आम्हाला ३० ऑगस्टचा निर्णयही मान्य नसून सदर करवाढ सरसकट रद्द करण्याची आमची मागणी आहे. नाशिककरांवर लादलेली ही अन्यायकारक जिझिया करवाढ सरसकट मागे घेतली जावी अशी आमची भूमिका आहे.

त्याचबरोबर नाशिक शहरातील सिडकोमधील अतिक्रमण निर्मुलन मोहीम, नाशिक शहरातील जुन्या गावठाणाचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविणे. नाशिक शहर व परिसरातील भाविक व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन धार्मिक स्थळे पाडण्याच्या नोटीसा रद्द करण्यात याव्यात. तसेच नाशिक शहरातील अंगणवाड्या रद्द करण्याचा अन्यायकारक निर्णय रद्द करण्यात यावा. नाशिक शहर बससेवा नाशिक महापालिकेने चालविण्यास न घेता सदर बससेवा राज्य परिवहन महामंडळाने पूर्ववत चालवावी यासह इतर विविध मागण्यांसाठी  हे  आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे. नाशिकमधील नागरिक,शहरातील स्वयंसेवी संस्था, विविध संघटना यांनी सुद्धा या मोर्च्यामध्ये स्वयंस्फुर्तीने मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समीर भुजबळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*