Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नवरात्री २०१९ : नाशिकचे वेगळेपण जपणारा ‘दुर्गोत्सव’

Share

पारंपरिक बंगाली वेशभूषा…धूपारती हातात घेऊन केले जाणारे नृत्य…पारंपरिक संगीत…आणि जोडीला स्वादिष्ट बंगाली पदार्थ…गांधीनगर येथे दसऱ्यापर्यंत असेच उत्सवी व प्रसन्न वातावरण असणार आहे. निमित्त आहे, बंगाली समाजाच्या दुर्गोत्सवाचे. दुर्गोत्सवातून बंगाली संस्कृती या ठिकाणी अनुभवता येणार आहे. बंगाली बांधवांच्या नाशिक सार्वजनिक दुर्गा पूजा समितीतर्फे नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे ऐतिहासिक दुर्गापूजा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला.

गांधीनगर प्रेसचे मुख्य व्यवस्थापक रामगोपाल, वरिष्ठ व्यवस्थापक ए. के. सक्सेना, उत्सव समितीचे अध्यक्ष सुजाय गुप्ता यांच्या हस्ते उत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी सरचिटणीस दीपक घोष, उपाध्यक्ष प्रदीप दास, खजिनदार बिरुदास गुप्ता, सलद भादोडी, डा. तपास कुंडू, अभय मुखर्जी, रामचंद्र नंदी, प्रदिप बिश्वास, अशोक सरकार, सुब्रोतो विश्वास, संगिनी महिला समितीच्या रिटा कोंडू, श्वेता गुप्ता, रिना घोष, अंजुदास गुप्ता, पाली सेन, शिखा मंडल, मिथू राय तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. पुजारी उत्पल चटर्जी यांनी पूजाविधी सांगितला.

इंदूभूषण सरकार यांनी सुरुवात केलेल्या नाशिक मधील दुर्गापूजेचे यंदा ६६ वे वर्ष असून, या उत्सवात दुर्गामातेबरोबर लक्ष्मी, सरस्वती, कार्तिक, गणेश यांच्या आकर्षक मूर्ती कोलकत्याचे कलाकार घडवतात. मूर्तीसाठी कोलकत्याच्या हुगळीनदीतून माती आणली जाते. दहा भूजा असणारी दुर्गादेवीची महिषासुराचा वध करणारी मूर्ती हे बंगाली दुर्गामूर्तीचे वैशिष्ट्य आहे. भव्य व सुंदर मूर्ती, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी दूरहून भाविक हजेरी लावतात.

कल्पनाशक्ती पणाला लावत झाडुपासून बनविलेले झुंबर, बेलफळ, कवड्या यांनी साकारलेल्या खांबावर लावलेले नयनरम्य मधुबनी चित्र, डोळे दिपविणाऱ्या रोषणाईत वसलेली दुर्गेची मूर्ती थेट बंगालमधून आलेले कलाकार घडवितात. जन्म, शिक्षण, हजारो कौटुंबिक क्षण या सगळ्यांकडे पाठ फिरवित उच्चशिक्षणासह नोकरीसाठी शेकडो पाय नाशिकडे वळतात.

अनेक वर्षांपासून नाशिकला येणारे नोकरदार शहरात स्थिरावत असले तरी नाशिकच्या मातीत मनातील बंगाल जपणाऱ्यांनी आपल्या उत्सवांचा पाया शहरातही रचला आहे. म्हणून नाशिकमधील सार्वजनिक दुर्गा पूजा समितीतर्फे यंदाही दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. षष्ठीच्या दिवशी बंगाली बांधवांमध्ये सायंकाळी घट बसविण्यात येतात. मंडपामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिची सार्वजनिक पूजाअर्चा केली जाते.

उत्सव काळात पूजा, पुष्पांजली, बोधन, भोग, संध्या आरती, संधी पूजा, अपराजिता पूजा, सूं उत्सव आदी धार्मिक विधी होणार आहेत. बंगाली समाज पारंपरिक वेशभूषेत या उत्सवात सहभागी होतो. बंगाली बांधव दुर्गापूजेमुळे एकत्र येतात.

गांधीनगर येथील सामिष बंगाली पदार्थांचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत आहेत. याठिकाणी पारंपरिक बंगाली मिठाई तसेच विविध गोड पदार्थ चाखता येतील. बंगाल येथे दुर्गोत्सवात मांसाहारी पदार्थांना मागणी असते. याठिकाणी असलेल्या स्टॉल्समध्ये विविध बंगाली मांसाहारी पदार्थ उपलब्ध आहेत. विविध वस्तूंचे स्टॉल्स देखील या ठिकाणी आहेत.

विविध स्पर्धा

उत्सवादरम्यान शनिवारी  सकाळी अकराला फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वरिष्ठांसाठी खेळ तर सायंकाळी साडेसातला संगीत कार्यक्रम झाला. रविवारी सकाळी अकराला चित्रकला आणि प्रश्नमंजुषा तर सायंकाळी दुर्गा फेस्ट टॅलेन्ट हन्ट स्पर्धा झाली. सोमवारी महानवमीनिमित्त सकाळी विवाहित महिला तसेच युवकांसाठी स्पर्धा तर सायंकाळी ड्रीम सिंगर्सतर्फे संगीत कार्यक्रम होईल. मंगळवारी दशमीला दुर्गा क्रिकेट करंडक स्पर्धा होईल, अशी माहिती संयोजक दिपक घोष आणि रिता कंडू यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!