Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नवरात्री २०१९ : नांदगावचे ग्रामदैवत श्रीएकवीरा देवी

Share

नांदगाव। संजय मोरे
शांकबरी नदीच्या किनार्‍यावर वसलेले एकवीरा देवी मंदिर गावाच्या पश्चिमेला पूर्वामुख आहे. मंदिराभोवती विस्तीर्ण पटांगण आहे. जवळच व्यायामशाळा व शितला देवी मंदिर आहे. चैत्र पौर्णिमाला पाच दिवस व नवरात्रीचे नऊ दिवस एकवीरा देवीची मोठी यात्रा भरते.

एकवीरा देवीचे साडेतीन पीठांपैकी अमरावती, धुळे व नांदगाव हे पूर्ण पीठ आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. या काळात ब्रह्मानंद महाराज यांना देवीचा दृष्टांत झाला. पेशव्यांच्या सहकार्याने एकवीरा देवीची शेंदूर मूर्तीची स्थापना होऊन मंदिर उभारणी करण्यात आली. मातेचा महिमा वाढत गेला अन् भाविकांची गर्दी होत गेली.

एकवीरा देवीचे मंदिर आखिव-रेखीव व दगडी बांधकामातील आहे. मंदिराला दोन घुमट आहेत. दर्शनी भागात दगडी दीपमाळ आहे. याच ठिकाणी छोटेसे गणपती मंदिर आहे. श्रीगणेशाचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश केल्यावर पितळी कासवाची मूर्ती बसविलेली दिसते. गाभार्‍यात भिंतीवर देव-देवतांचे चित्रे रेखाटली आहेत. गाभार्‍यात जाताना कमरेत वाकून छोट्याशा दरवाजातून एकवीरा देवीचे दर्शन घडते.

एकवीरा देवीची सध्या मंदिरात असलेली 11 फूट उंचीची मूर्ती सप्तशृंगी निवासिनीप्रमाणेच आहे. 18 भुजा (हात) असून, तिच्या प्रत्येक हातात विविध प्रकारचे शस्त्र आहे. देवीच्या पायथ्याशी महिषासुर तसेच शुंभ व निशुंभ यांच्या प्रतिमा आहेत.

नवरात्रोत्सवात एकवीरा देवी मंदिरात महिलांची घटी बसण्याची प्रथा पूर्वीपार चालत आली आहे. आजही या मंदिरात घटी बसणार्‍या महिलांची संख्या लक्षणीय आहे. आपापल्या परीने भाविक येथे येऊन देवीच्या चरणी लीन होत नवस करतात. नवसपूर्ती झाली की, नवस फेडतात. नवसामध्ये भाजी -भाकरी, गूळ व भाकर मिळून बनवलेला काला याचा नैवेद्य भाविक अर्पण करतात.

नवरात्रोत्सव काळात देवीला सोने-चांदीचे आभूषणे चढविले जातात. मंदिरात नवरात्रोत्सव काळात पहाटे 4 वा., दुपारी12 वा. व रात्री 8 वाजता त्रिफळ आरती व महापूजा केली जाते. मंदिरात दर्शनासाठी भाविक विशेषत: महिलावर्ग पहाटे पासूनच गर्दी करतात. देवीच्या पूजेची जबाबदारी चार पिढ्यांपासून गुरव घराण्याकडे आहे. आज या घराण्याचे एकमेव वारस गुरव परिवारकडे पूजेची परंपरा सांभाळत आहे. एकवीरा देवी मंदिराबरोबरच शहरात कालिकादेवी, म्हमादेवी, लक्ष्मी मंदिर, हिंगलाज माता, शितलादेवी, नांदेश्वरी देवी आदी देवींची मंदिरे आहेत.

नवरात्रौत्सवात नऊ दिवस पोथी वाचन, भजने, पारायणे आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. नांदगाव तालुक्याचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेली व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे. नवस फेडण्यासाठी येथे कोणताही बळी दिला जात नाही. भाजी- भाकरीचा नवैद्य दिला जातो, हे विशेष!

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!