Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिवस : महाविद्यालयांमध्ये ‘फिट इंडिया’ अभियान

Share

नाशिक । भारत पगारे
भारत देशाला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी ‘फिट इंडिया अभियान’ विद्यापीठे आणि महाविद्यालयांत राबवविण्यात यावे, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले आहेत. पंतप्रधान येत्या 29 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत हे अभियान सुरू करणार आहेत.

युजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी सर्व विद्यापीठांना पाठविलेल्या पत्रानुसार सर्व शिक्षण संस्था, उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठे आदी संस्थांच्या प्रशासनाने विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, सेवकांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधितांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शक्ती आणि भावनिक समानता मिळणार आहे. फिट इंडिया अभियान राबविण्यासाठी काही उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यात 29 ऑगस्ट रोजी संबंधित सर्वांना दूरदर्शन वाहिनीच्या माध्यमातून मोदी आरोग्याची शपथ देणार आहेत.

प्रत्येकाने त्या दिवशी किमान 10 हजार पावले चालणे गरजेचे आहे. शक्य असल्यास त्याचा दैनंदिन जीवनातही वापर करावा. त्या दिवशीच्या कार्यक्रमाची एक छोटी व्हिडिओ क्लिप तयार करावी. याचबरोबर शैक्षणिक संस्थांनी आरोग्यासंदर्भातील एक योजना सुरू करणे गरजेचे आहे. योजनेत खेळणे, व्यायाम, शारीरिक हालचाली यांचा समावेश अभ्यासक्रमात करावा. प्रत्येकाने योजनेनुसार दैनंदिन जीवनचर्याही करावी, असे सांगितले आहे.

विद्यापीठांचे कुलगुरू आणि संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी एका महिन्याच्या आत ही योजना तयार करून, त्याची माहिती स्वत:च्या वेबसाइटवर टाकायची आहे. युजीसीने तयार केलेल्या ‘फिट इंडिया’ पोर्टलवर अपलोड करायची आहे. 29 ऑगस्ट रोजी होणार्‍या कार्यक्रमाचा फोटो आणि व्हिडिओ युजीसीच्या पोर्टलवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अपलोड करण्याचे आदेशही युजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी दिले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!