नाशिक जिल्ह्यातील धरणांत उरले 22 टक्के पाणी

0
नाशिक : तापमानाने चाळिशी गाठल्याने मेच्या प्रारंभी उकाड्याची तीव्रता वाढली असताना जिल्ह्यातील 7 मोठ्या व 17 मध्यम प्रकल्पांत 14 हजार 601 दशलक्ष घनफूट म्हणजे 22 टक्के जलसाठा आहे.

गतवर्षी याच काळात जलसाठ्याचे हे प्रमाण केवळ 7 टक्के होते. धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याने गतवर्षीच्या तुलनेत टँकरची संख्याही लक्षणीय कमी झाली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात 176 टँकर सुरू होते. त्या तुलनेत यंदा जिल्ह्यात 42 टँकर सुरू आहेत.

मागील काही वर्षांत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच टंचाईग्रस्त गावांना 176 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. समाधानकारक पावसामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या यावर्षी अतिशय कमी झाली आहे. धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा असला तरी वाढत्या उन्हामुळे त्याचे बाष्पीभवन वेगात होत आहे. गतवर्षी दुष्काळात जिल्ह्यातील आठ धरणे कोरडीठाक पडली होती.

यंदा पुणेगाव, नागासाक्या, माणिकपुंज ही तीन धरणे रिक्त झाली आहेत. उर्वरित धरणांमध्ये सध्या 22 टक्के जलसाठा आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 2264 दशलक्ष घनफूट (40) टक्के जलसाठा आहे.

कश्यपी धरणात 1326 (72), गौतमी गोदावरी 87 (5) असा गंगापूर धरण समूहात एकूण 37 टक्के जलसाठा आहे. पालखेड 240 (37), करंजवण 347 (6), वाघाड 61 (3), ओझरखेड 330 (15), तीसगाव 43 (10), दारणा 1776 (25), भावली 106 (7), मुकणे 728 (10), वालदेवी 145 (13), कडवा 321(19), नांदूरमध्यमेश्वर 44 (17), चणकापूर 906 (37), हरणबारी 347 (30), केळझर 36 (6), गिरणा 4722 (26), पुनद 626 (48) असा जलसाठा असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाढत्या तापमानाने धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. परिणामी जलसाठा कमी होण्यास हातभार लागत आहे. गेल्यावर्षी मेच्या प्रारंभी धरणांमध्ये 4362 दशलक्ष घनफूट (7 टक्के) जलसाठा होता. यंदा त्या तुलनेत 15 टक्के जलसाठा अधिक असल्याने टंचाईच्या झळा कमी आहेत.

42 टँकरने पाणीपुरवठा : दरवर्षी डिसेंबरपासून अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. एप्रिल व मे महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या शेकडोंच्या घरात पोहोचते. यंदा मात्र तशी स्थिती नाही. टंचाई शाखेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 42 टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. मनमाड शहरात पालखेडच्या आवर्तनाचे पाणी पोहोचले आहे. तर चणकापूर, दारणा, पुनदमधूनही पाणी सोडण्यात आल्याने टंचाईच्या झळा कमी जाणवत आहेत.

LEAVE A REPLY

*