Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुंबई-नाशिक-मनमाड-शिर्डी अशी विशेष रेल्वेगाडी लवकरच सुरु होणार?

Share

ना. रोड । प्रतिनिधी
मुंबई-नाशिक-मनमाड-शिर्डी अशी विशेष रेल्वेगाडी सुरु करण्यास रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अनुकूलता दर्शविली आहे. तसे झाल्यास साईभक्तांची मोठी सोय होऊन रेल्वेलाही मोठा महसूल मिळणार आहे.

पायी अथवा रस्ता मार्गाने मुंबईचे हजारो साईभक्त शिर्डीला जात असतात. अपघात होऊन साईभक्त जखमी किंवा मृत्यू पावतात. ही ट्रेन सुरु झाल्यास साई भक्तांना सुरक्षा लाभणार आहे.

रेल्वेच्या राष्ट्रीय स्तरावरील एनआरयुसीसी (नॅशनल रेल्वे युटिलीटी युजर कौन्सिल) समितीवर नाशिकचे अभियंता नितीन वानखेडे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांनी नवी दिल्लीत पियूष गोयल यांची भेट घेऊन अशा एक्सप्रेसची मागणी केली होती. त्याला गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त प्रविण गेडाम हे सध्या रेल्वेमंत्र्यांचे स्वीय सचिव म्हणून काम पाहत आहेत. त्यांची भेट घेऊन वानखेडे यांनी मुंबई-नाशिक-शिर्डी ट्रेनचा प्रस्ताव ठेवला. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली. मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, चेन्नई-बेंगलोर, दिल्ली-जयपूर अशा इंटरसिटी ट्रेन सध्या सुरु आहेत.

दोन प्रमुख शहरांना जोडण्यासाठी इंटरसिटी ट्रेनचा वापर केला जातो. या गाड्यांना लोकल प्रमाणे विशेष दर्जा असतो. नाशिकची पंचवटी एक्सप्रेस, पुण्याच्या डेक्कन एक्सप्रेसला असा दर्जा आहे. मुंबई-नाशिक-शिर्डी ट्रेनही याच दर्जाची असणार आहे. या ट्रेनचे तीन कोच नाशिकसाठी राखीव असतील. नाशिकला धार्मिक, उद्योग, व्यवसाय, पर्यटनासाठी येणारे मुंबईकर कामे आटोपून मुंबईला पोहचतील. नाशिकचे पर्यटन वाढेल, असेही उद्देश ही ट्रेन सुरु करण्यामागे आहेत.

ट्रेन फायद्याची
मुंबईहून हजारो साईभक्त पायी तसेच खासगी वाहनांनी शिर्डीला नियमित जात असतात. देशभरातील अनेक साईभक्त मुंबईला उतरुन तेथून शिर्डीला जातात. काही साईभक्तांना मनमाड, कोपरगाव आदी मार्गावर जाऊन रेल्वे गाडी पकडावी लागती. मुंबई-नाशिक-मनमाड-शिर्डी अशी इंटरसिटी ट्रेन सुरु झाल्यास साईभक्तांची मोठी सोय होणार असून रेल्वेला मोठा महसूल मिळणार आहे.

ही गाडी मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स किंवा दादर, कुर्ला येथून सकाळी साडेपाचला निघाल्यानंतर दादर, ठाणे, कसारा, नाशिक, मनमाड, शिर्डी असे थांबे घेत सकाळी अकरापर्यंत शिर्डीला पोहोचेल. शिर्डीत बाराचे दर्शन व आरती झाल्यानंतर ही गाडी चारच्या सुमारास पुन्हा परतीच्या प्रवासाला निघून रात्री दहापर्यंत मुंबईला पोहोचेल, असे नियोजन असल्याचे वानखेडे यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!