Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये माफक दरात एमआरआय सुविधा

Share

नाशिक । प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये बहुप्रतिक्षित एमआरआय सुविधा सुरू झाली आहे. यामुळे क्लिष्ट आजारांवर उपचार शक्य होणार असून अतितातडीच्या आरोग्यसेवाही उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे माफक दरात ही सुविधा रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहे, अशी माहिती एसएमबीटी हॉस्पिटल प्रशासनाने दिली.

वैद्यकीय क्षेत्रात आजाराचे अचूक निदान करण्यासाठी एमआरआय (मॅग्नेटिक रिसॉन्स इमॅजिंग) ही सुविधा वापरली जाते. एमआरआय तपासणीत रेडिओ वेवजद्वारे मानवी शरीराचे सूक्ष्म छायाचित्र घेतले जाते. यातून डॉक्टरांना रुग्णांच्या आजाराचे निदान करणे अधिक सोपे जाते. या चाचणीत मेंदू, मणके, जॉईंट आदींची प्राधान्याने सूक्ष्म चाचणी होते.

यासाठी आवश्यक असणारी मशिनरी अत्यंत महागडी असल्याने निवडक रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असते. सामान्यतः या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पाच ते सात हजार रुपये आकारले जातात. मात्र एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने सुरू करण्यात आलेली एमआरआय सुविधा सर्व प्रकारच्या रुग्णांना माफक दरात म्हणजे रुपये २००० मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, या हेतूने एसएमबीटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. या हॉस्पिटलमार्फत महाराष्ट्रातील गरीब व गरजू रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मेंदूच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना एमआरआयसारखी चाचणी करताना खासगी एमआरआय सेंटर किंवा रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. या चाचण्या महागड्या असल्याने गरीब व गरजू रुग्णांना पदरमोड करून या चाचण्या कराव्या लागत असत. मात्र एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये माफक दरात एमआरआय सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना त्याचा अधिक लाभ होणार आहे.

याव्यतिरिक्त एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, कॅन्सर, मेंदू व मणकेविकार, मूत्रविकार, अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग, नवजात शिशू, प्लॅस्टिक सर्जरी, मेडिसीन, नेत्ररोग, दंतरोग आणि आयुर्वेद आदी सर्वच रोगांवर मोफत तपासणी व आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात.

माफक दरात परिपूर्ण आरोग्यसेवा
एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने एमआरआय सुविधा अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच सुविधेसाठी इतरत्र पाच ते सात हजार रुपयांपर्यंतची रक्कम आकारली जाते. याव्यतिरिक्त एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या आरोग्यसेवा मोफत उपलब्ध आहेत. बहुतांशी शस्त्रक्रिया येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!