ध्यास स्वप्नपूर्तीचा : गावठाणासाठी क्लस्टर योजना दृष्टिपथात

0
मेळा बसस्थानकाचे विमानतळाच्या धर्तीवर विकासाचे काम प्रगतिपथावर आहे. महिलांसाठी स्वतंत्र 100 खाटांचे रुग्णालय, प्रदूषणमुक्तीसाठी गोदावरी कृती आराखडा, राईट टू एज्युकेशन कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी असो वा खासगी इंग्रजी माध्यमांची मनमानी या प्रत्येक विषयांसर्दभात विधानसभेत आवाज उठवला. उद्योग विकासासाठी पतंजली फूड पार्क, मल्टिपर्पज पार्किंग, जुने नाशिक विकासासाठी क्लस्टर योजना, संदर्भ रुग्णालयात यंत्रसामग्री खरेदी ही कामे…

देवयानी फरांदे, आमदार

नाशिक मध्य मतदारसंघ म्हणजे शहरातील प्रमुख बाजारपेठेचा परिसर, जुने नाशिकचा भाग या मतदारसंघात मोडतो. या मतदारसंघाची रचना पाहता नियोजनात्मक विकास कामांवर भर दिला. याकरिता मी आधी विकासकामांचे नियोजन केले आणि त्यादृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करून ही कामे आता मार्गी लागत आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाशिक मेळा बसस्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्यात येत आहे.

हजारो प्रवाशांची रोज वर्दळ असलेल्या, परंतु, सुविधांच्यादृष्टीने अत्यंत वाईट मानले जाणारे मेळा बसस्थानक हे ठक्कर बसस्थानकाबरोबर एकत्र आणून ते विमानतळाच्या धर्तीवर साकारण्यात येत आहे. ठक्कर बसस्थानक वगळता जुन्या सीबीएस मेळा बसस्थानकाची अवस्था अत्यंत वाईट आहे. सीबीएसमधून जिल्हांतर्गत प्रवासी सेवा दिली जाते. मेळा बसस्थानकातून प्रामुख्याने त्र्यंबकेश्वरकडे प्रवासी ये जा करतात.

त्यामुळे हे बसस्थानक हायटेक करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील पाच बसस्थानके अद्यावतीकरणाच्या यादीत मेळा बसस्थानकाचा क्रमांक लागला आहे. या बसस्थानकाची सुमारे साडेबारा कोटींची कामे करण्यात येणार आहे. 55 हजार चौरस फुटांचे सर्वात मोठे बसस्थानक असेल. 20 बसेसचे प्लॅटफॉर्म असलेला बसथांबा, वातानुकूलित बसस्थानक, प्रवाशांसाठी शॉपिंगची व्यवस्था, सिनेमागृह, लिफ्टची सोय, सुमारे दोनशे दुचाकी पार्किंगची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, साहित्य स्कॅनिंग मशिन, सीसीटीव्ही अशा प्रकारची या बसस्थानकाची रचना असेल. हे काम प्रगतिपथावर आहे.

महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय
महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना त्यांचे प्रश्न सोडवणे; माझे आद्यकर्तव्यच आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. केवळ महिलांसाठीच रुग्णालय असावे, ही संकल्पना मला मनापासून भावली आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रस्तावाचा मी पाठपुरावा सुरू केला. आरोग्य विभागाने या संदर्भातील सकारात्मक निर्णय दिला मात्र जागेच्या वादामुळे हा प्रकल्प बाजूला पडला होता. मात्र, आता भाभानगर येथे ही रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

संदर्भ रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीं
विभागीय संदर्भ रुग्णालयात आणखी दहा डायलिसीस यंत्रे व डायलिसीस चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने संदर्भ सेवा रुग्णालय सुरू केले. परंतु गेल्या काही दिवसांपासून संदर्भ सेवा रुग्णालयातील अत्याधुनिक यंत्रणेच्या अभावामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. तसेच संदर्भ रुग्णालयात उत्तर महाराष्ट्रातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे रुग्णालयातील डायलिसीस विभागातील मशिन कमी पडत आहेत. रुग्णालयात दर दिवशी डायलिसीस प्रतीक्षा यादी 20 ते 25 आहे. यामुळे संदर्भ सेवा रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये रुग्णांचे डायलिसीस केले जाते. त्यामुळे येथे आणखी डायलिसीस मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रदुषणमुक्त गोदावरी
सातपूर औद्योगिक वसाहतीत 274 कारखाने व अंबड औद्योगिक वसाहतीत 404 कारखाने सुरू असतांना औद्योगिक विकास महामंडळाने गटारीची व्यवस्था केलेली नाही हे गंभीर आहे. 2 महिन्यांत सातपूर व अंबड येथे गटार व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून देणे कामी सूचना औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना देण्याचे अन्यथा कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव डॉ. अनबलगन यांना दिले

झोपडपट्टीमुक्त नाशिकसाठी एसआरए योजना
नाशिक महानगर पालिका अंतर्गत एस. आर. ए. योजना राबविणे कामी स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले आहे. नाशिक महानगर पालिका अंतर्गत अनेक झोपडपट्टी ह्या विकासापासून वंचित असल्याने या झोपडपट्टीत एस.आर.ए योजना राबविणे गरजेचे असल्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती. त्याअनुषंगाने सदर अहवाल मागविण्यात आलेला आहे. नाशिक शहरात 172 झोपडपट्टी असून सदर झोपडपट्टी विकासासाठी एस.आर.ए योजना राबविण्याची मागणी केलेली होती.

पुणे शहरात एस.आर.ए योजना राबविण्यात आलेली असून, त्याचा फायदा झोपडपट्टीधारकांना झालेला आहे. सर्वांकरिता घरे या योजनेमध्ये शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. जेएनयूआरएमच्या माध्यमातून ज्या घरकुल योजना बांधल्या गेल्या याकरिता सात ते आठ वर्षांचा कालावधी लागला. मात्र अद्यापही काही घरकुलांचे वाटप झालेले नाही. आज अनेक खुल्या जागेवर झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. मात्र, खुल्या जागांवर घरकुलांचे निर्माण करता येणार नाही. याकरिता शासनाने वेगळ्या पद्धतीने धोरण आखण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार नाशिक शहरात एसआरए योजना व गावठाण विकास मान्य करावी, अशी मागणी आपण शासनाकडे केली आहे. यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त होणार आहे.

मल्टिपर्पज पार्किंग
नाशिक शहरात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.याकरीता नाशिक जिमखान्याशेजारी शालिमार, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जिल्हा न्यायालय आवार, सराफ बाजार आर.के, पंडित कॉलनी मनपा कार्यालयासमोरील लायन्य क्लबजवळील मनपा जागेत, राजेबहादूर हॉस्पिटल शेजारी, अशोक स्तंभ, आकाशवाणी टॉवरजवळ गंगापूररोड, या ठिकाणी हे मल्टिपर्पज पार्किंग उभारण्यात येणार आहे.

पतंजली फूडपार्क
नाशिक शहराला लाभलेला नैसर्गिक संपन्नतेचा वारसा, नाशिकचे हवामान, मुबलक पाणी, वीज, दळणवळणच्या दृष्टीने रस्ते वाहतूक, विमान वाहतूक अथवा रेल्वे वाहतून सर्व पर्याय उपलब्धता यामुळे नाशिक शहरात जगातील प्रख्यात व मोठमोठे औद्योगिक प्रकल्प येण्यास सुरुवात झालेली आहे. प्रगत तंत्रज्ञान, कुशल-अकुशल कामगार या गोष्टी सुद्धा नाशिक शहरात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी द्राक्षे, डाळींब, टमाटे, कांदा, मिरची आदी उत्पन्न घेतात, परंतु बाजारपेठेचा अनियमितपणा, निसर्गाचा लहरीपणा, व्यापारांचा त्रास यामुळे गरीब शेतकरी नेहमी चिंतेत असतो, त्याला त्याच्या कष्टाचा नियमितपणे चांगला मोबदला मिळणे, यासाठी स्वामी रामदेवबाबा यांच्या पतंजली योग पीठातर्फे नागपूर येथील मिहान येथे सुरू होत असलेल्या पतंजली फूड पार्कच्या धर्तीवर नाशिक येथे पतंजली फूड पार्क प्रकल्प उभारल्यास संपूर्ण उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी व युवकांच्या रोजंदारीचा व समृद्धीचा प्रश्न मार्गी लागेल. जवळपास 50 हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल, येथील शेतकर्‍यांचा माल थेट पतंजली फूड पार्कसाठी उपलब्ध होऊन, त्यामुळे शेतकरी खर्‍या अर्थाने सुजलाम् सफलाम् होण्यास मदत होईल हा महत्त्वाचा उद्देश समोर ठेवून मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली. तसेच स्वामी रामदेव बाबा यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव दिला असून, त्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली असून, प्रकल्प अहवालाचे काम सध्या सुरू आहे.

टाकळीचा होणार विकास
दासबोध या परिपूर्ण ग्रंथाबरोबरच मनाचे श्लोक, गणपती आरतीची निर्मिती आणि गोमय मारुतीची रामदास स्वामींनी स्थापना केली. टाकळी ही त्यांची तपोभूमी आहे. टाकळीचा सज्जनगडाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींनी गोमय हनुमानाची प्रतिष्ठापना करून 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यामुळे समर्थ भक्तांच्या दृष्टीने टाकळीचे महत्त्व मोठे आहे. हनुमान भक्त समर्थांचे अभ्यासक व भाविक नाशिक दर्शनादरम्यान टाकळीला येतात. त्यामुळे या ठिकाणचा विकास करण्यात येणार आहे. तसेच रामकुंंड परिसरात वाराणसी आणि हरिव्दार येथे होणार्‍या गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी नदीवर आरती व्हावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

*