Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मंत्रिपदाचा नाशिकला दुष्काळच!; आघाडी आणि युतीकडूनही उपेक्षा

Share

नाशिक । कुंदन राजपूत
कधीकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या नाशिक जिल्ह्याला आघाडी सरकारच्या कारकिर्दीत उपमुख्यमंत्रीपदाचा मान लाभला. नाशिक शहर मतदारसंघाचा विचार करता गेल्या 50 वर्षात शहराला मंत्रीपदाचा ‘दुष्काळ’च सहन करावा लागला आहे. भाजपचे डॉ. डी.एस.आहेर कॅबिनेटमंत्री तर काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव राज्यंमत्री झाल्या.

हे दोन अपवाद वगळता नाशिक शहराला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देण्याबाबत सत्ताधारी पक्षांकडून दुर्लक्षच झाल्याचे स्पष्ट होते. आघाडीसोबतच युती सरकारकडूनही मंत्रिपदाबाबत नाशिकच्या पदरी उपेक्षाच आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ताज्या विस्तारातसुद्धा मंत्रिपदाने नाशिकला पुन्हा हुलकावणी दिली आहे.

मालेगावचे हिरे कुटूंब हे राज्यातील कधीकाळी तालेवार घराणे होते. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, अवघ्या एका मताने त्यांचे नाव मागे पडले आणि नाशिकचा मुख्यमंत्री पदाचा मान हुकला. त्यानंतर हिरे घराण्यात बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांतदादा हिरे यांनी मंत्रीपद भुषवले. तर, येवल्यातून राजकारणाची नवी इंनिग खेळणारे राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्या रुपाने नाशिकला उपमुख्यमंत्री पदाची संधी लाभली.

तसेच, वनाधिपती विनायकदादा पाटील, तुकाराम दिघोळे, ए.टी.पवार, बबनराव घोलप, दादा भुसे यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्याला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले. जिल्ह्याला ंसंधी मिळाली असली तरी नाशिक शहरावर मात्र, मंत्रीपदाबाबत अन्यायच झाल्याचे पहायला मिळते. पुर्वी नाशिक शहर हा एकच मतदारसंघ होता. नंतर 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर शहरात मध्य, पूर्व, पश्चिम असे तीन मतदारसंघ अस्तित्वात आले.

मंत्रीमंडळ विस्तारात मात्र, नाशिक शहरावर नेहमची अन्याय झाला. 1995 ला युती सरकारच्या काळात नाशिक शहर मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे डॉ.डी,एस.आहेर यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. त्यांच्याकडे आरोग्य खाते होते. त्यानंतर थेट 12 वर्षाचा दुष्काळानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांना 2008 मध्ंये आरोग्य राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली.

हे दोन अपवाद वगळता नाशिक शहराला मंत्रीमंडळात मानाचे पान भेटलेच नाही. नूकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात हा दुष्काळ दूर होऊन नाशिकला संधी मिळेल, अशी चिन्हे होती. मात्र, ‘दत्तक’ नाशिक उपेक्षितच राहिले. एकूणच सत्तेत आघाडी असो की युती मंत्रीपदाबाबत नाशिकच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली आहे.

मंत्रीपद नसले तरी विकासाला प्राधान्य
मंत्री मंडळात पवार, विखे, थोरात, गडाख, मोहीते – पाटील, गावित व काही मोजक्या घराण्यांचा प्रभाव पहायला मिळतो. मात्र, लाल दिवा मिळूनही त्यांना शहर व जिल्ह्यात विकासाची भरीव कामे करता आली नाही. या उलट नाशिक शहराला मंत्रीपदाचा वारसा लाभला नाही. मात्र, जे कोणी निवडून आले त्या प्रत्येकाने नाशिकच्या विकासात हातभार लावला. त्यामुळे मंत्रीपद नाही लाभले तरी इतर शहरांच्या तुलनेत नाशिक झपाटयाने प्रगती करत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!