नाशिक कृउबाचे पाच दिवसात 17 कोटी रुपयांचे नुकसान

0
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बजार समितीत रोज 5 ते 6 हजार क्विंटल कृषीमाल येतो. त्यातून सुमारे 3 कोटी रुपयांची उलाढाल होते. शेतकरी संपानंतर आतापर्यंत 17 कोटी रुपयांची उलाढाल थांबली असल्याची माहिती बाजार समिती कार्यालयाकडून देण्यात आली.

राज्यातील महत्त्वाच्या मोठ्या बाजार समित्यांपैकी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती एक आहे. या बाजार समितीत दररोज 300 हून अधिक वाहनांद्वारे हजारो क्विंटल फळभाज्या, पालेभाज्या, फळे येतात. त्याद्वारे दररोज कोटयवधी रुपयांची उलाढाल होते. शेतकरी संपानंतर भाजीपाल्याची एकही गाडी बाजार समितीत दाखल झालेली नाही.

त्यामुळे व्यापारी, आडते, हमाल, बाजार समितीला कोणत्याही प्रकारचे शुल्क प्राप्त झालेले नाही. कृषीमालच नसल्याने पुढील व्यवहार ठप्प झालेले आहेत. शेतकरी संपाचे राज्याचे केंद्र नाशिक जिल्हा ठरल्यामुळे नाशिकमध्ये संपाची धार तीव्र आहे. 100 टक्के शेतकर्‍यांनी कृषीमाल विकण्यास विरोध केल्याने एकही गाडी भाजीपाला बाजार समितीत आलेली नाही. मागील पाच दिवसांपासून बाजार समितीत शुकशुकाट आहे. दरम्यान रविवारी शेतकर्‍यांच्या झालेल्या बैठकीत संप चालूच ठेवण्याचा निर्धार झाल्याने पुढील तीन ते चार दिवस उलाढाल ठप्प राहण्याची स्थिती आहे.
दरम्यान, नाशिक बाजार समिती जरी बंद असली तरी पुणे कृषी उत्पन्न बाजर समिती व वाशी नवी मुंबई येथील बजार समिती चालू असल्याने काही टक्के माल हा बंदोबस्तात पोहोचविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील अन्य तालुका बाजार समित्यांमध्येही शुकशुकाट असल्याने त्याठिकाणीही कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. संप कधी मिटणार या प्रतीक्षेत व्यापारी, आडते, बाजार समिती कार्यालये आहेत. भाजीपाला मिळावा व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी व्यापारी, आडते, बाजार समितीतील अन्य घटक वाट पाहत आहेत.

LEAVE A REPLY

*