नाकृउबा समिती सचिव सक्तीच्या रजेवर; समितीच्या सर्वसाधारण बैठकीत संचालक मंडळाचा ठराव

0
पंचवटी । नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांचे कामकाज असमाधानकारक असून संचालकांना योग्य माहिती न देणे, फोनवर उद्धट बोलणे, संचालक मंडळास विश्वासात न घेता सभेच्या विषयपत्रिकेत स्वतःहून विषय घुसवणे आदी तक्रारींचा पाढा वाचताना पुढील दोन महिन्यांसाठी कृउबा सचिव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव आज झालेल्या बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाने केला.

तसेच सुमारे 3 तास सुुरू असलेल्या या सभेत तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी विद्यमान संचालक मंडळाने केली असून प्रभारी सभापती शामराव गावित यांनी हा ठराव तात्काळ मंजूर केला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात आज प्रभारी सभापती शामराव गावित यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. गत महिन्यात झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर आजची सभादेखील विविध विषयांवर वादग्रस्त ठरली.

प्रारंभी संचालक संपत सकाळे यांचा पुतण्या अंकुश सकाळे यांचे निधन झाल्याने श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी काही संचालक मंडळाने आजची सभा तहकूब करण्याची मागणी केली. मात्र सभा तहकूब करण्यावरून दोन गट निर्माण झाल्यानंतर अखेर सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेच्या सुरुवातीलाच संचालकांना न विचारता ठरावावर सूचक व अनुमोदक म्हणून परस्पर नावे घेतली जात आहेत.

अनेक विषयांवर संचालकांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप काही संचालकांनी केला. यापूर्वी बाजार समितीचे कामकाज होत असताना अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे बाजार समितीची बदनामी तर झालीच त्याचबरोबर उत्पन्नदेखील कमी झाले आहे. बाजार समिती कामकाज होत असताना संचालक मंडळास माहितीदेखील नसते.

समितीचे कामकाज होत असताना सचिव अरुण काळे कुणालाही विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे त्यांना दोन महिन्यांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी शंकर धनवटे यांनी केली. त्यास सर्व संचालकांनी अनुमती दिल्याने कृउबा सचिव काळे यांनी सभागृहाचा बाहेरचा रस्ता धरला.

तसेच बाजार समितीचे कर्मचारी दिगंबर चिखले, अरविंद जैन, विजय निकम यांना बाजार समितीत रुजू करून घ्यावे किंवा पूर्ण पगार द्यावा या विषयावर संचालक मंडळाने कडाडून विरोध करताना या कर्मचार्‍यांची बाब न्यायप्रविष्ठ असल्याने जोपर्यंत त्यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत या कर्मचार्‍यांचा विषय सभेत घेऊ नये, असे ठरवण्यात आले. पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केटमधील गाळे परस्पर गाळेधारकांना खरेदीखत दिले असल्याचा आरोप करण्यात आला. कृउबातील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झाली असून सफाई कामगार नेमके करता काय? या विषयावरदेखील चर्चा करण्यात आली.

नवीन आडत कंपनी जय तुळजाभवानी व्हेजिटेबल कंपनीस तात्पुरत्या स्वरुपाचे बांबूचे शेड उभारण्याची परवानगी यावेळी संचालक मंडळाने दिली. सर्वसाधारण बैठकीच्या विषयपत्रिकेवरील अनेक विषयांवर यावेळी वादग्रस्त चर्चा झाल्यानंतर अनेक विषय यावेळी संचालक मंडळाने नामंजूर केले.

यावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालय प्रतिनिधी संजय गिते, शंकर धनवटे, शिवाजी चुंभळे, तुकाराम पेखळे, युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, विमल जुंद्रे, दिलीप थेटे, विश्वास नागरे, संजय तुंगार, रवींद्र भोये, भाऊसाहेब खांडबहाले, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम, रुची कुंभारकर, सुनील खोडे, रामदास भोये, हेमंत खंदारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*