मार्च स्पेशल : वाळवण खाद्यपदार्थ बनवण्यात महिला व्यस्त; ग्रामीण भागात एकोपा आजही टिकून

0

नाशिक । प्रतिनिधी
मार्च महिना म्हंटला की, महिलांना वेध लागतात ते उन्हाळी खाद्यपदार्थ बनवण्याचे. ग्रामीण भागात घराघरांत महिला पापड, कुरडया, शेवया, वेफर्स, चकल्या, वडे आदी खाद्यपदार्थ तयार करण्यात व्यस्त दिसत आहे.

एकेकाळी संयुक्त कुटुंबामुळे एकाच घरातल्या अनेक स्त्रिया या पदार्थांची निर्मिती सहज करीत असत. परंतु, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आता सोसायटी अथवा परिसरातील स्त्रिया एकमेकींच्या मदतीने या पदार्थांची निर्मिती करीत असतात. तर गृहिणी आजही हे पदार्थ घरी करतात. त्यासाठी उडदाची डाळ, कुरडयांचे गहू, तसेच नागली, साबुदाणा, ज्वारी, पोहे या पापडासाठी लागणार्‍या पदार्थांची सगळ्यांची मिळून घाऊक खरेदीही केली जाते.

शिवाय भाजीत वापरले जाणारे केवळ हरबर्‍याच्या अथवा मुगाच्या किंवा मिक्स वड्यांचेही घाणे घातले जात आहेत. ज्वारी, नागली, साबुदाणा, बटाटा याचे पळी पापड अनेक ठिकाणी गच्चीत घातले जात आहेत. कुठे-कुठे साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्याही पहायला मिळतात.

पापडासाठी जुना बटाटा वापरला जातो आहे. एकट्या व्यक्तीला या वस्तू तयार करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे गल्ली-बोळांमध्ये काही महिलांनी एकत्र येऊन टप्याटप्याने हे साहित्य करण्यास सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्याने हे पदार्थ तयार करावे लागत असल्याने अनेक महिला एकत्र येऊन दुपारच्या वेळी कुरडया तयार करताना दिसतात. त्यामुळे हे पदार्थ तयार करण्यासाठी विविध यंत्रांचा वापर केला जात आहे.

आधुनिक काळात विविध यंत्राने शेवया आणि पापड तयार करून दिले जातात. त्याचाही आधार बर्‍याच गृहिणींकडून घेतला जातो. हे सर्वच पदार्थ करणे हे अत्यंत जिकिरीचे काम असल्याने शक्यतो ते तयार करवून घेणे किंवा रेडिमेड वापरणे याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले असले तरी अनेक घरात त्यांचे घाट आजही घातले जात आहेत.

कुटुंबात आनंद
आधुनिक युगात सोशल मीडियामुळे जरी जग जवळ आले असले तरी प्रत्यक्षात एकमेकांमधील संवाद दूर होत चालला आहे. आज सर्वजण बिझी शेड्यूलमध्ये व्यस्त आहे. महिला उन्हाळ्यात वाळवणीचे पदार्थ बनवण्यासाठी एकमेकांना मदत करायच्या. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. रेडिमेड पदार्थ विकत घेण्याकडे महिलांचा कल दिसून येत आहे. मी मात्र परंपरागत चालत आलेल्या रुढीप्रमाणे कुटुंबाची मदत घेत वाळवणीचे पदार्थ बनवले आहे. यामुळे एकोपा राहून कुटुंबात आनंदही मिळतो
– सुमित्रा लभडे, गृहिणी

शहरात रेडिमेडवर भर
अनेकांच्या घरात रोजच्या जेवणात असणारा हमखास पदार्थ म्हणजे पापड हा जेवणापूर्वी स्टार्टर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पापड बनवण्याचीही लगबग महिलावर्गात दिसून येत आहे. नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेकांना हे पदार्थ घरी बनवणे शक्य नसते. त्यामुळे रेडिमेड पदार्थ खरेदीला नोकरदार महिला प्राधान्य देताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

*