Video : आबालवृद्धांसह ‘नाशिक मॅरेथॉन’मध्ये धावले हजारो स्पर्धक; विदेशी खेळाडूंचा सहभाग

अभिनेत्री संयमी खेर, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

0

सर्व फोटो आणि व्हिडीओ दिनेश सोनवणे, देशदूत डिजिटल नाशिक

नाशिक | नाशिक पोलीस आयोजित ‘नाशिक मॅरेथॉन’ आज हजारो आबालवृधांसह विदेशी पर्यटकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. ४२ किमी, २१किमी, १०किमी, ५ किमी व ३  किलोमीटर गटात आजची नाशिक मॅरेथॉन पार पडली.

नाशिकची बॉलीवूड अभिनेत्री संयमी खेर, मराठी अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि विदेशी पर्यटक आजच्या  मॅरेथॉनचे खरे आकर्षण ठरले.

पहाटे पाच वाजेच्या सुमारास ४२ किमीत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी नाशिक मॅरेथॉनचा श्रीगणेशा केला.   त्यानंतर ६ वाजता २१ किमी व नंतर ठराविक वेळाने बाकीच्या रनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना सोडण्यात आले.

पहाटेच्या गुलाबी थंडीत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान नाशिककरांच्या गर्दीने पहाटे चार वाजेपासूनच गच्च भरले होते.  मॅरेथॉनच्या शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, खा. हेमंत गोडसे, नाशिककर अभिनेत्री संयमी खेर, अभिनेता चिन्मय उदगीरकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., अप्पर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक तसेच सर्व धर्मीय धर्मगुरू याठिकाणी उपस्थित होते.

मॅरेथॉनमध्ये परदेशी धावपटूंनीही हजेरी लावत मॅरेथॉनची शोभा वाढवली. केनियातील काही परदेशी पर्यटक खेळाडूंनी तर रनमध्ये प्रत्यक्ष सहभागदेखील घेतला.

नाशिकमध्ये नियमितच विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. आजच्या नाशिक मॅरेथॉनमुळे या पर्यटकांना अनोखी सकाळ नाशकात अनुभवता आली. याठिकाणी गुलालवाडी ढोल पथक, नाशिकचे विविध ढोल पथकांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले. तसेच भांगडा नृत्यात अनेक नाशिककरांसह विदेशी पर्यटकदेखील थिरकले होते.

मॅरेथॉनच्या मार्गावर तब्बल ४० ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यात आला. यासाठी अनेक संस्था, विद्याथ्र्यांनी पुढाकार घेतला होता. मॅरेथॉनप्रसंगी ठिकठिकाणी स्टेज उभारून स्पर्धकांचे मनोरंजन नाशिकमधील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले. यात अनेक संस्थादेखील सहभागी झाल्या होत्या.

यंदाच्या नाशिक मॅरेथॉनमध्ये गतिमंद मुले, ज्येष्ठ नागरिक हेल्मेटबाबत जनजागृती करणारे बोर्ड, वाहतूक सुरक्षा अशा अनेक संकल्पना राबवून जनजागृती करण्यात आली.

इस्पलीयर शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी १० किमी स्केटिंग करून या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. मॅरेथॉनदरम्यान, स्पोर्ट्स बाईक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. एकूणच आजची सकाळ सर्वच नाशिकरांनी वेगळ्या अनुभवाने साजरी केली.

जनजागृती केंद्रस्थानी  : नाशिक मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनातून वाहतूक शिस्त, जातीय सलोखा, सायबर क्राइम, तसेच युवकांच्या कर्तव्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे. यातून पोलीस आणि नागरिकांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न आहे.

पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल

दर दोन किमीला मेडिकल सुविधा : ही मॅरेथॉन स्पर्धा तीन, पाच, दहा एकवीस आणि बेचाळीस किलोमीटर अशा अंतराच्या टप्प्यांमध्ये विविध गटांत पार पडली. यावेळी स्पर्धकांना धावताना काही त्रास झाल्यास दर दोन किलोमीटरच्या अंतरावर ॲम्ब्युलन्ससह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली  होती.

नाशिकचा मिनी कुंभमेळा : नाशिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने नाशिककर एकत्र जमले. सकारात्मकतेसाठी आज नाशिकमध्ये जणू कुंभमेळाच भरलेला असल्याचे नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केले.

नाशिक मॅरेथॉनचे काही निवडक व्हिडीओ

LEAVE A REPLY

*