देना बँकेच्या तगाद्याला कंटाळून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

0

उगाव (वार्ताहर)

ता. १० : देना बँकेच्या कर्जवसुलीच्या नोटीसा येऊ लागल्याने उगावच्या खचलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली.

शेतकऱ्यांवर कर्जवसुलीसाठी सक्ती करू नये या शासनाच्या निर्देशानंतरही ग्रामीण भागांतील सहकारी, खासगी बँकांसह राष्ट्रीयकृत बँकांनीही सक्तीची वसुली आणि नोटीसा देणे सुरूच ठेवले  असून याच प्रकारच्या नोटीसांमुळे एका शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. या प्रकाराने परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.

उगांव  येथील शेतकरी रामदास पांडुरंग बिरार  यांची उगांव येथे दीड एकर शेती आहे. सदर शेतीच्या पिकांसाठी बिरार यांनी देना बँकेकडून  द्राक्षमंडप अँगलसाठी 3  ‌लाख रूपये व मध्यम मुदत एक लाख, पिक कर्ज एक लाख, तसेच लासलगांव मर्चंट बँकेचे सोनेतारण 85 हजार असे पाच लाख पंच्यांऎंशी हजाराचे कर्ज  घेतले होते. याशिवाय उधार उसनवारी एक  लाख पन्नास हजार असे एकूण 8  लाख 35  हजार रुपयांचे कर्ज होते .

त्यातच कर्जवसुलीसंदर्भात नोटीसा येऊ लागल्याने ते खचले होते. कुटुंबात केवळ कर्जफेडीचीच चर्चा‌ ते करत  होते. या चिंतेत  काल दि 9 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वे मार्गावर शिवडी शिवारात आत्महत्या केली.

पंचनामा करण्यात आला. खिशात, ‘मी  कर्जबाजारीपणाला कंटाळुन आत्महत्या करत आहे माझ्या म्रुत्यूला बायकोला व घरातील कोणालाही जबाबदार धरु नये, माझ्यावर देना बँकेचे तसेच इतर कर्ज आहेत, मी अडचणीला कंटाळून जीवन संपवत आहे.’  अशा मजकुराची चिठ्ठी आढळून आली.

निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात  शुक्रवारी म्रुतदेहाची उत्तरिय तपासणी केल्यानंतर तो नातेवाईकांकडे देण्यात आला   उगांव येथे त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले,एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे .

LEAVE A REPLY

*