Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड पाणीप्रश्न : पाणी द्या अन्यथा शहर सोडू; उच्चशिक्षित बसले उपोषणाला

Share

मनमाड (प्रतिनिधी) | मनमाडचा पाणी प्रश्न पेटला असून शासन दरबारी दाखल करण्यात आलेली करंजवन पाणी पुरवठा योजना तातडीने मंजूर करावी यासाठी  शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा  अशी मागणी केली जात आहे.

‘आम्ही मनमाडकर’च्या बैनरखाली ५ नागरिकांनी आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषण करणाऱ्यामध्ये 3 डॉक्टर व  २ समाज सेवकांचा समावेश आहे. पाण्यासाठी होत असलेल्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सोबत सर्वसामान्य नागरिकांनी उस्फुर्तपणे पाठींबा दिला आहे.

आम्ही मनमाडकरच्या नेतृत्वाखाली उपोषणकर्त्यांनी शहरातून जनजागृती रॅली काढली. कोण म्हणत देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही, पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, करंजवन योजना मंजूर झालीच पाहिजे आदी घोषणा देत ही रैली शहरातील विविध मार्गावरून जावून शिवाजी चौकात आल्यावर डॉ.सुहास जाधव, डॉ.अमोल गुजराथी, डॉ.सतिष हारदे, सतिष गांगुर्डे व अमित बाकलीवाल या  5 नागरिकांनी आमरण उपोष्ण सुरू केले.

या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी डॉ.संदीप कुलकर्णी, डॉ,सौ कुलकर्णी, डॉ.सौ. डोंगरगावकर, डॉ.सौ.कातकडे, डॉ.धारवाडकर. डॉ.गुजराथी, डॉ.भन्साळी यांच्यासह विविध पक्ष, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून मनमाड शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी नाही सुटला, तर शहर सोडण्याची वेळ नागरिकावर येईल त्यामुळे ही समस्या सुटावी यासाठी सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला पाठींबा दिला.

यावेळी बोलताना उपोषणकर्ते डॉ.सुहास जाधव म्हणाले की, आम्ही नो पॉलीटिक्स, नो ब्लेमगेम, ओन्ली वाटर हे ब्रीदवाक्य घेवून उपोषण सुरु केले आहे.  जो पर्यंत सरकार करंजवन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, गटनेते गणेश धात्रक, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, अल्ताफ खान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जय फुलवानी, नगरसेवक लियाकत शेख, गंगाभाऊ त्रिभुवन, मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर यांच्यासह विविध पक्षाचे नगरसेवक,पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेवून चर्चा केली.

आंदोलनाला डॉक्टर असोशियन, मेडिकल असोशियन, लायन्स, रोटरी, जेसीज मनमाड बचाव कृती समिती,मुस्लीम विचार मंच यांच्यासह इतर राजकीय पक्ष,सामाजिक संघटनानी पाठींबा दिला आहे.

पालिका प्रशासना तर्फे शासनाकडे दाखल करण्यात आलेल्या करंजवन पाणी पुरवठा योजनेला सरकार कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री ना.गिरीश महाजन हे स्वता जातीने लक्ष घालून ही योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती गणेश धात्रक यांनी दिली.

या योजनेसाठी  ना.महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पाणी पुरवठा मंत्री व पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र दिले आहे त्यात नाशिक जिल्ह्यात मनमाड हे महत्वाचे शहर असून येथे कमी पर्जन्यमान व शाश्वत पाणी साठा उपलब्ध नसल्याने पिण्याच्या पाण्याचे कायम दुर्भिक्ष असून शहरात महिन्यातून एकदाच पाणी देण्याची परिस्थिती निर्माण होते.

त्यामुळे या शहरासाठी करंजवन धरणातून नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे या योजनेचा प्राथमिक अहवाल नगरविकास विभागाकडे सादर झालेला आहे  हि योजना शीघ्र कार्यन्वित होणे गरजेचे असल्याचे पत्रात म्हटले आहे त्यामुळे लवकरच या योजनेला शासन मंजूर करणार असल्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!