Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाल्याने दिवाळी होणार गोड

Share

मनमाड : एकीकडे यंदा पावसाने सर्वत्र सलग दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच छोटे-मोठे बंधारे आणि धरण तुडुंब भरून वाहू लागले आहेत. दरम्यान मागील चार वर्षांचा इतिहास पाहता यंदा मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे सव्वा लाख मनमाड करांची दिवाळी नक्की गोड होणार आहे.

साधारण पावसाळा संपण्याच्या काही दिवसांपूर्वी पाणी टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांना धडकी भरली होती कि यंदा ही धरण कोरडे तर राहणार नाही ना ? मात्र परतीच्या पावसाने सलग जोरदार हजेरी लावली आणि पाहता पाहता वागदर्डी धरण केवळ पूर्ण भरलेच नाही तर ओवर फ्लो होऊन वाहू लागले. धरण तुडुंब भरल्याचे वृत्त वाऱ्या सारखे पसरले मात्र त्याच्यावर सहजासहजी कोणाचाही विश्वास बसत नव्हता. परतीच्या पावसाने साथ दिल्यामुळे एक हंडा पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या शहरातील सव्वालाख नागरिकांचा जीव भांड्यात पडला आणि यंदाची दिवाळी गोड ठरत असल्याचे पाहून सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला

भुसावळ विभागात महत्वपूर्ण मानले जाणारे रेल्वेचे मोठे जंक्शन स्टेशन, इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आदी वेगवेगळ्या ऑयल कंपन्यांचे इंधन प्रकल्प, रेल्वेचे ब्रिज बनविण्यासाठी लागणारे साहित्य तयार करणारा ब्रिटीश कालीन रेल्वेचा कारखाना, भारतीय अन्न महामंडळाचे आशिया खंडात क्रमांक २ चे मानले जाणारे धान्य साठवणूक करणारे गोडाऊन आदीमुळे देशभरात मनमाडचे नाव प्रसिद्ध आहे. मात्र तब्बल ३५ वर्षा पासून शहरातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत असल्यामुळे पाणी टंचाईचे माहेर घर म्हणून देखील या शहराची आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे.

हिवाळा तर सोडाच पावसाळ्यात देखील येथील नागरिकांना कधीच दोन किंवा चार दिवसाआड पाणी मिळाले नाही. गेल्या वर्षी तर वाघदर्डी धरणातील पाणी साठा संपला होता, केवळ मृत साठा शिल्लक होता. त्यातून तब्बल महिन्यातून एकदा ते देखील अनियमित आणि फक्त पिण्या पुरताच पाणी पुरवठा केला गेला. उन्हाळ्यात तर चक्क टैंकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. दाही दिशा भटकंती करून देखील एक हंडा पाणी लवकर मिळत नसल्याचे पाहून पाणी टंचाईला वैतागून तब्बल दहा हजार नागरिकांनी इतर शहरात स्थलांतर केले होते. मात्र सुदैवाने यंदा शेवटच्या टप्प्यात सलग जोरदार पाऊस झाला त्यामुळे तब्बल ४ वर्षा नंतर वागदर्डी धरण पूर्ण भरून ओवर फ्लो झाले. या आदी २०१५-१६ ला धरण पूर्ण भरले होते.

धरण तुडुंब भरल्यामुळे पाणी टंचाईतून नागरिकांची सुटका होऊन आता त्यांना किमान आठवड्यातून एकदा पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून सणासुदीच्या काळात नियमितपणे पाणी मिळणार असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यासाठी यंदाची दिवाळी आणखी गोड झाली आहे.

चार वर्षा पूर्वी असेच धरण पूर्ण भरले होते, मात्र अवघ्या काही महिन्यातच धरणातील पाणी साठा संपुष्टात येवून नागरिकांवर पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली होती. धरणात पाणी येवून देखील शहरात पाणी टंचाई का निर्माण होते याचा तपास केला असता परिसरात अनेक अनधिकृत विहिरी खोदण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यांनी या विहिरी खोदलेल्या आहेत, त्यापैकी काहींनी तर थेट धरणातून आडवे बोर करून विहिरीत पाणी घेत असल्याचेही बोलले जाते तर काही जण सर्रासपणे मोटारी लावून धरणातील पाण्याने विहिरी भरून घेतात.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या परिसरात ५०० मीटर परिसरात विहिरी अथवा बोरवेल करण्यास कायद्यानुसार बंदी आहे असे असताना देखील मात्र वागदर्डी धरणाच्या परिसरात अनेक विहिरी असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच धरणातील पाणी साठा हा झपाट्याने कमी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले त्यामुळे याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर आगामी काळात मनमाडच्या सव्वा लाख नागरिकांना पुन्हा एक हंडा पाण्यासाठी दही दिशा भटकण्याची वेळ आल्या शिवाय राहणार नाही.

पाणी चोरीला आळा घालण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची जितकी आहे, तेवढीच जबाबदारी सर्व नगरसेवक आणि राजकीय पक्षांची देखील आहे. मनमाड शहरात दिल्ली पेक्षाही जास्त राजकीय पक्ष असून अनेक वेळा ते छोट्या-छोट्या आणि नको त्या गोष्टीवर आंदोलने छेडतात आता हे राजकीय पक्ष धरणातून होत असलेली पाणी चोरी रोखण्यासाठी काय करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!