Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिव्हील, संदर्भमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमास परवानगी

Share

नाशिक। प्रतिनिधी
जिल्हा शासकीय रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची मान्यता मिळाली आहे. तर जिल्हा शल्यचिक्सिक आणि अधिष्ठाता यांची जबाबदारीही शासनाने निश्चित केली आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या चार सदस्यिय पथकाने मंगळवारी (दि.16) जिल्हा रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होऊ शकतो का नाही याची पाहणी केली होती. यांनतर आज ही परवानगी देण्यात आली. त्यादृष्टीने या दोन्ही रुग्णालयांमधील खाटा, रुग्ण कक्ष, शस्त्रक्रिया विभागांचा वापर करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास मान्यता मिळाली आहे.

अभ्यासक्रमास मंजुरी मिळाल्यानंतर महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु किंवा त्यांचे प्रतिनिधी, वैद्यकीय शिक्षण संचालकांचे प्रतिनिधी आणि आरोग्य सेवाचे उपसंचालक तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, संदर्भ रुग्णालयाचे अधीक्षक यांची एक समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आणि रुग्णालयांवरील प्रशासकीय नियंत्रण जिल्हा शल्यचिकित्सकांचे राहणार आहे. तर अभ्यासक्रमाबाबत आर्थिक जबाबदारी आणि शैक्षणीक विभागाचे नियंत्रण अधिष्ठांताचे राहणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नेमलेले डॉक्टर्स, नर्सेस, तंत्रज्ञ व इतर कर्मचारी वर्ग सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली राहणार असून क्षैक्षणीक उपक्रमासाठी लागणार्‍या सर्व वैद्यकीय व अवैद्यकीय पदांची निर्मिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे होणार आहे. त्याचे नियंत्रण अधिष्ठाता यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली राहिल.

भारतीय आर्युविज्ञान परिषदेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मानकांनुसार आवश्यक प्राध्यापक व निवासी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स व कर्मचार्‍यांची नेमणूक वैद्यकीय शिक्षण विभाग करणार आहे. रुग्णालयांना लागणारी यंत्रसामुग्री, औषधे व साहित्य पुर्वीप्रमाणेच आरोग्य विभागामार्फत पुरविण्यात येणार आहे. तसेच उपकरणे, फर्निचर, इमारत देखभाल तसेच आहार, स्वच्छता, सुरक्षा, धुलाई आदी सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे पुरवण्यात येणार आहेत.

दुहेरी लाभ
जिल्हा रुग्णालय आणि विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केल्यास तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि उपचार यात वाढ होण्यासोबतच अभ्यासक्रमाच्या एकूण प्रवेश क्षमतेत वाढ होणार आहे. यामुळे विद्यार्थी तसेच रूग्णांच असा दुहेरी लाभ होणार आहे.
– डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!