महापालिकेला विजयादशमीच्या निर्माल्याचा विसर; मूर्ती, घटासोबतच्या निर्माल्यामुळे गोदावरी प्रदूषणात भर

0
नाशिक । गेल्या महिन्यातील गणेशोत्सवात श्री विसर्जनाच्या दिवशी पावणे दोन लाखाच्या आसपास श्री मुर्ती संकलन व 131 टन निर्माल्य जमा करणार्‍या महाापलिकेला विजयादशमीच्या विसर पडल्याचे दिसुन येत आहे.

नदी संवर्धनासाठी व प्रदुषण मुक्तीसाठी उपाय योजना करणार्‍या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज गोदावरी नदीच्या प्रदुषणात मोठी भर पडली आहे. शहरा गोदावरीसह शहरात इतर नद्या व नाल्यात व काठाजवळ देवी मुर्ती, निर्माल्य व घटासह पुजेचे साहित्य टाकण्यात आले. विशेष म्हणजे विजयादशमीच्या दिवशी गोदाकाठावरील सुरक्षा रक्षक व कर्मचारीच गायब असल्यामुळेच नदी प्रदुषण झाल्याचे समोर आले आहे.

नाशिक शहरातील गोदावरी नदी प्रदुषण मुक्तीकरिता मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेनंतर न्यायालयाने नाशिक महापालिकेला प्रदुषण मुक्तीकरिता विविध उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहे. नदीचे पावित्र्य जपतांना प्रदुषण टाळण्याकरिता थेट पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवस पोलीसांकडुन फिरता बंदोबस्त ठेवण्यात आला.

नंतर मात्र आपोआप पोलीस गायब झाले. यावरुन पुन्हा न्यायालयाने कडक शब्दात सुनावल्यानंतर महापालिकेने त्यानुसार अलिकडच्या काही महिन्यापुर्वी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करुन नदीत निर्माल्य व कोणताही कचरा टाकला जाऊ नये याची जबाबदारी सुरक्षा रक्षकांवर देण्यात आली आहे. तसेच नदी कचरा टाकणार्‍यावर हजार रुपये दंडाची कारवाई देखील सुरू झाली. त्यानंतर पंचवटीत गोदावरी नदी संवर्धन कक्ष देखील सुरू करण्यात आला आहे.

याच उपाय योजनानंतर गोदावरीसह शहरातील इतर नद्यां प्रदुषण होऊ नये म्हणुन महापालिकेकडुन काम सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात श्री विसर्जनाच्या दिवशी शहरातील नदी – नाल्यात प्रदुषण होऊ नये म्हणुन 28 ठिकाणी कृत्रिम तलाव करण्याबरोबरच मुर्ती संकलनाकरिता नदीकाठावर मंडप उभारुन सामाजिक संस्थाच्या मदतीने मुर्ती व निर्माल्य संकलनाचे काम महापालिकेने केले. यात 1 लाक 69 हजार 957 श्री मुर्ती व 131.6 टन निर्माल्य संकलनाचे काम करण्यात आले. यामुळे गोदावरीसह इतर नद्या व नाल्याचे संभाव्य प्रदुषण टाळण्यात महापालिका प्रशासनाला यश आले.

गणेशोत्सवाप्रमाणेच नंतर येणारा नवरात्रोत्सवात देखील देवी मुर्ती व निर्माल्य हे नदी काठावर येत असते, याचा विसर मात्र महापालिका प्रशासनाला पडला. विजयादशमीप्रमाणेच नवरात्रोत्सवात घराघरात घट स्थापना केली जाते. तसेच बहुतांशी भागात आदिशक्तीची स्थापना करुन तिचे विसर्जन देखील दसर्‍यांच्या दिवशी केले जाते. असे असतांना महापालिकेने नदी प्रदुषणात भर टाकणार्‍या उत्सवाच्या निमित्ताने प्रदुषण टाळण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या नाही. परिणामी विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी दहा दिवस घटांसोबत जमणारे निर्माल्य संकलनाकरिता कोणतीही व्यवस्था केली नाही.

त्याचबरोबर नदीत निर्माल्य – घट टाकले जाऊ नये म्हणुन नागरिकांना कोणतेही आवाहन करण्यात आले नाही. तसेच सामाजिक संघटनांना देखील निर्माल्य संकलनाकरिता पुढे येण्याचे आवाहन देखील करण्यात आले नाही. इतकेच काय गोदाकाठावर असलेले सुरक्षा रक्षक देखील रामकुंडापासुन ते रोकडोबा तालीम पर्यत गोदाकाठावरुन गायब झालेले दिसुन आले. तसेच काही ठिकाणी निर्माल्य कलश मोकळे आणि कलशाला निर्माल्याचा वेढा असे चित्र गोदाकाठावर दिसुन आले. तसेच नागरिक विजया दशमी आणि आजही नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसाचे जमलेले निर्माल्य हे गोदाकाठावर आणुन टाकत असल्याचे दिसुन आले.

यामुळे अगदी रामकुंडालगत, जुना भाजीबाजार सुलभ शौचालयाच्या मागील भाग, भाजीबाजार लगत गोदाकाठ, गाडगेमहाराज पुलाखालील भाग आदी भागात मोठ्या प्रमाणात घट, लहान बांबुची पाटी, मुर्ती, निर्माल्यासह प्लॉस्टिकच्या पिशव्याचा कचरा मोठ्या प्रमाणात पडुन होता. सायंकाळपर्यत याठिकाणी महापालिकेचे सफाई कर्मचारी अथवा घंटागाडी फिरकली नाही. त्याचबरोबर असेच चित्र शहरातील इतर नद्या – नाल्यांच्या काठावर दिसुन आले. गणेशोत्सवाप्रमाणेच विजयीदशमीकरिता मुर्ती – निर्माल्य संकलनाकरिता उपाय योजना केल्या असत्या तर गोदावरी सह नद्या – नाल्यात प्रदुषणात भर पडली नसती.

LEAVE A REPLY

*