Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शेतमालाचे ‘महा फार्म्स’कडून ब्रॅण्डिंग; तीनशे कॉप शॉप उभारणार

Share

नाशिक । प्रतिनिधी
शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला शेतमाल आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांसाठी राज्य सरकारने स्वत:चा ‘महा फार्म्स’ ब्रॅण्ड बाजारात आणला आहे. त्यातून तब्बल 190 हून अधिक उत्पादने बाजारात आणली जाणार असून त्यासाठी तीनशे कॉप शॉपच्या (विक्री केंद्र) माध्यमातून बाजारात उतरण्याची तयारी करण्यात आली आहे.

राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एमसीडीसी) कंपनीमार्फत ‘महा फार्म्स’ हा ब्रॅण्ड बाजारात आणण्यात आला आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये पंजाबमध्ये या ब्रॅण्डचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर राज्यातील निवडक ठिकाणी मोजकीच उत्पादने घेऊन या शॉपची सुरुवात करण्यात आली होती. प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पॅक्स), शेतकरी कृषी उत्पादन कंपनी आणि बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू कॉप शॉपच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जाणार आहेत.

सध्या शहरी भागात 162 आणि ग्रामीण भागात 541 विक्री केंद्रातून मोजक्याच वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात मसाले, गूळ, सुकामेवा अशा उत्पादनांचा समावेश आहे. त्यातही कायमस्वरुपी असणारी विक्री केंद्रे केवळ पाच ते सहा आहेत. उरलेली विक्री फिरत्या वाहनांच्या माध्यमातून होत आहे.

आता कॉप शॉप आणि ग्राहकपेठेसारख्या सहकारी संस्था, मॉल्स यांच्याशीही करार करण्यात येऊन त्यामुळे लवकरच ग्राहकांना शेतकर्‍यांचा स्वत:च्या ब्रॅण्डच्या वस्तू विकत मिळणार आहेत. ग्राहक आणि शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी अटल अर्थसहाय्य योजनेतून राज्यात लवकरच तीनशेहून अधिक कॉप शॉप उभारले जाऊन पाचशे ते एक हजार सदनिका असलेल्या सहकारी गृहसंस्था,

ग्राहक पेठ यासारख्या सहकारी संस्था, अपना बाजार, भारती बाजार, सह्याद्री बाजार आणि नामांकित कंपन्यांच्या मॉलशी करार केले जातील आणि ग्राहकांना स्वस्तात वस्तू मिळेल याची काळजी घेण्यात येणार आहे. अटल अर्थसहाय्य योजनेला नुकतीच मान्यता मिळाली असून त्याअंतर्गत कॉप शॉपसाठी 80 कोटी 4 लाख 69 हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.

या वस्तू मिळतील कॉप शॉपमध्ये
तूरडाळ, पीठ, आवळा कॅण्डी, मध, लोणचे, तूप, चहा मसाला, सेंद्रीय उत्पादने, रसायनविरहित गूळ, मिरची पूड, तांदूळ, ज्वारी, बाजरी, फळांचा रस, कांदा मसाला, शेंगदाणा चटणी आदी.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!