Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

नाशिक लोकसभा 2019 : खासदार गोडसे सतरा उमेदवारांना वरचढ

Share

नाशिक । कुंदन राजपूत
नाशिक लोकसभा मतदारसंघात सलग दुसर्‍यांदा बाजी मारण्याची दमदार कामगिरी शिवसेनेचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी केली. त्यासोबतच मतदारसंघात यांनी इतिहासही घडवला. गोडसे यांनी 5,63,599 मते मिळवून विरोधकांची दाणादाण उडवली.

निवडणूक रिंगणातील त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ व उर्वरीत 16 उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज खासदार गोडसे यांना मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. त्या सर्वांच्या मतांची गोळाबेरीज 5 लाख 50 हजारांच्या आसपास पोहचते. गोडसे यांनी रिंगणातील 17 उमेदवारांना धोबीपछाड दिला.

नाशिककर सलग दुसर्‍यांदा कोणालाही लोकसभेवर पाठवून दिल्लीवारीची संधी देत नाहीत. गेली 48 वर्षे ही परंपरा नाशिककरांनी अबाधित ठेवली होती. त्यामुळे राज्यात नाशिकची लढत लक्ष्यवेधी ठरली होती. राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ, भाजपचे बंडखोर माणिकराव कोकाटे व वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांंसह एकूण 17 उमेदवार रिगंणात होते. प्रामुख्याने चौरंगी लढत होईल, असे बोलले जात होते.

मात्र मोदी लाट व शिवसेनेच्या संघटनाच्या जोरावर खासदार गोडसेंनी पुन्हा एकदा नाशिकच्या गडावर भगवा फडकवण्याचा करिष्मा केला. सलग दुसर्‍यांदा निवडून येण्याचे मानकरी ते ठरले. त्यांना तब्बल 5,63,599 मते मिळाली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत गोडसेंना 4,94,135 मते मिळाली होती. गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा 69,464 अधिक मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी समीर भुजबळ यांना 2,71,395 मतांपर्यंत मजल मारता आली.

पवन पवार व माणिकराव कोकाटे हे रडत-खडत एक लाखांचा टप्पा गाठू शकले. खासदार गोडसे यांच्या विरोधातील 17 उमेदवारांच्या मतांची बेरीज ही खासदार गोडसेंना मिळालेल्या मतांपेक्षाही कमी भरत आहे. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडत आहे. सलग दुसर्‍यांदा निवडून येण्यासोबतच 16 उमेदवारांचे डिपॉजीट जप्त करण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.

16 जणांचे डिपॉजिट जप्त
खासदार गोडसे यांचे धनुष्यबाण असे काही चालले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासह इतर उमेदवारही गारद झाले. राष्ट्रवादी वगळता मतदारसंघातील उर्वरीत 16 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले. त्यात जिल्ह्यातील मातब्बर नेते अ‍ॅड.माणिकराव कोकाटे व वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यावरही डिपॉझीट जप्तीची नामुष्की ओढावली.

16 हजारांची ‘नोटा’ला पसंती
नाशिक लोकसभा मतदारसंघात 4 प्रमुख उमेदवार वगळता उर्वरीत 12 उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते पडली. या उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ने जादा भाव घेतला. नाशिकमध्ये 6,980 मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबले तर दिंडोरीत 9,446 मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. दोन्ही मतदारसंघ मिळून 16,426 जणांनी ‘नोटा’ बटण दाबले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!