आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय अजिंक्य

0

नाशिक : शिवाजी स्टेडीयम येथे संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी नाशिकने करंजाळीच्या महंत जमुनादास महाराज महाविद्यालयाचा २३ विरुद्ध १५ असा ८ गुणांनी पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले.

सदर स्पर्धेत नाशिक विभागातील ४८ संघांनी सहभाग नोंदविला होता. सकाळ सत्रात उपउपांत्य फेरीचे चार सामने झाले. त्यांनतर पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महंत जमुनादास महाराज महाविद्यालय करंजाळीने मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या सायखेडा कॉलेजचा ३३ विरुद्ध १५ ने असा १८ गुणांनी पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, एल.व्ही.एच. पंचवटी महाविद्यालयाने सांघिक खेळाच्या जोरावर के.के वाघ आर्ट्स सायन्स कॉलेज चांदोरीचा १२ गुणांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली.

अंतिम फेरीच्या रंगदार सामन्यात लोकनेते व्यंकटराव महाविद्यालयाने प्रारंभापासूनच आपल्याकडे आघाडी राखली होती. पंचवटी महाविद्यालयाच्या समाधान काकडे, भरत मालुसरे, शाकीब सैय्यद यांच्या आक्रमक चढायाच्या जोरावर करंजाळीच्या महंत जमुनादास महाराज महाविद्यालयाचे संरक्षण भेदत २३ विरुध्द १५ असा ८ गुणांनी पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

पराभूत संघाकडून शुभम बारमाटे, आकाश इंगळे यांनी पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. विजयी संघाला प्रा. संतोष पवार, राम कुमावत, व किरण गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी रवि नाईक यांनी सदिच्छा भेट दिली.

LEAVE A REPLY

*