Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

नाशिक लोकसभा 2019 : खा.गोडसेंचा ऐतिहासिक विजय; भुजबळांचा दारुण पराभव

Share

नाशिक । नाशिक लोकसभा मतदारसंघात सलग दुसर्‍यांदा कोणी खासदार निवडूण येत नाही या परंपरेला तडा देत महायुतीचे उमेदवार खा.हेमंत गोडसे यांनी सलग दुसर्‍यांदा विजयी होण्याचा इतिहास रचला. त्यांनी महाआघाडीचे उमेदवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना तीन लाख मतांनी पराभव करत धुव्वा उडवला. खा.गोडसे यांना विक्रमी पाच लाख 63 हजार 710मते मिळाली. विशेष म्हणजे भुजबळांना पडलेल्या मतांपेक्षा खा.गोडसे यांच्या मताधिक्य जादा होते.

महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतीमध्ये नाशिकच्या जागेचा समावेश होता. त्यातही सलग दुसर्‍यांदा कोणी खासदार होती नाही, हे या मतदारसंघाचे वैशिष्ट. त्यामुळे खा.गोडसे विरुध्द भुजबळ ही लढत काट्याची ठरेल, असे बोलले जात होते. गुरुवारी (दि.23) अंबड येथील वेअर हाऊसमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते व पदाधिकारी या ठिकाणी ठाण मांडून होतेे. निकाल काय लागणार याची धाकधूक व तणाव त्यांच्या चेहर्‍यावर होती.

मात्र, पहिल्या पोस्टल फेरीपासून खा.गोडसेंनी विजयी आघाडी घेतली. प्रत्येक फेरी दरम्यान, खा.गोडसेंचे मताधिक्य वाढत गेले. त्या तुलनेत पहिल्या फेरीपासूनच भुजबळ हे पिछाडीवर होते. भाजपचे बंडखोर कोकाटे हे तिसर्‍या तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार हे थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. प्रत्येक मतमोजणी फेरीत खा.गोडसेंचे मताधिक्य वाढत होते. प्रारंभीच्या फेर्‍यानंतरच ही लक्षवेधी लढत एकतर्फी होत गेली. खा.गोडसेंनी दहाव्या फेरीत तब्बल एक लाखांचे मताधिक्य घेतल्यानंतर मात्र, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली.

त्यामुळे शिवसेैनिकांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली. पंधराव्या फेरीनंतर तर खा.गोडसेंनी अडीच लाख मतांचा डोंगर सर केला. खा.गोडसेंनी दीड लाखांचे मताधिक्याचा टप्पा गाठल्यानंतर सेनेचा विजय ही काळा दगडावरील पांढरी रेष ठरली. भुजबळ शेवटपर्यंत या मताधिक्याचा आसपासही पोहचू शकले नाही. 15 व्या फेरीतील आकडेवारीनंतर सेना व राष्ट्रवादीतील पराभवाची दरी आणखी वाढत गेली.

विजयाची आशा दुरापास्त झाल्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी हळूहळू काढता पाय घेणे पसंत केले. प्रत्येक फेरीनंतर खा.गोडसेंची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरु होती. महायुतीच्या पदाधिकार्‍यांचे पावले वेअर हाऊसकडे वळत होती. खा.गोडसेंचा विजयाची फक्त घोषणा होणे बाकी होते. शेवटची 27 वी अंतिम फेरीची मोजणी झाली तेव्हा खा.गोडसे यांनी साडे पाच लाख विक्रमी मते घेतली. तेथेच खा.गोडसेंच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यांनी इतिहास रचला.

खा.गोडसेंनी काढले पराभवाचे उट्टे
सन 2009 ची लोकसभा हेमंत गोडसे यांनी मनसेकडून लढवली होती. यावेळी त्यांचा मुकाबला समीर भुजबळ यांच्याशी झाला होता. त्यात गोडसे यांना 15 हजारांनी निसटत्या पराभवाला समोरे जावे लागले होते. मात्र, यंदा या पराभवाची परतफेड करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी मागील पराभवाचे उट्टे काढण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.

उमेदवारांना पडलेली मते
खा.हेमंत गोडसे –  5 लाख 63 हजार 710
समीर भुजबळ –  2 लाख 71 हजार 344
माणिकराव कोकाटे –  1 लाख 34 हजार 559
पवन पवार –  1 लाख 9 हजार 591

विकासाला प्राधान्य
देशाचे नेतृत्व कोणाच्या हाती दयायचे हे ठरविणारी ही निवडणूक होती.देशाला सक्षम नेतृत्व मोदीच देऊ शकतात. गेल्या पाच वर्षात विमान सेवा, नदीजोड प्रकल्प, महांमार्ग प्रश्न, रोजगार, औद्योगिक विकास, आयटी सेक्टर विकास, दिल्ली – मुंबई कॉरीडोर, डिफेन्स इन्क्युबेशन हब, शेतीमालाच्या भावासाठी कृषी टर्मीनल हब असे प्रकल्प कार्यन्वित करण्यास प्रयत्न आहेत. केंद्राच्या नवीन स्कीम अंतंर्गत टॉमेटो, कांदा व बटाटयांसाठी नवीन प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. याद्वारे शेतकर्‍यांना चांगला फायदा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. बेरोजगांना रोजगार उपलब्ध करुन देणे आणि शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी पुढील काळात आपण प्राधान्य देणार आहोत.
– हेमंत गोडसे, खासदार

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!